एकूण संसर्गबाधितांचा आकडा 474 : बेंगळूरमध्ये 19 जणांची भर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी 29 जणांची भर पडली. शुक्रवारी 3826 जणांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आले. त्यातील 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 474 वर पोहोचली आहे. तर 152 जण पूर्णपणे संसर्गमुक्त झाले आहेत. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटीनमधून ही माहिती स्पष्ट झाली आहे.
बेंगळूरमध्ये 19, बागलकोटमध्ये 3, विजापूर आणि बेळगाव जिल्हय़ात प्रत्येकी 2, चिक्कबळ्ळापूर, मंडय़ा आणि तुमकूर जिल्हय़ात शुक्रवारी प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. बेंगळूरमध्ये आढळून आलेल्या 19 रुग्णांपैकी पादरायनपूर येथे कोरोना योद्धय़ांवर हल्ला केलेल्या 5 जणांचा समावेश आहे. तर दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळलेल्या बिहारी कामगारामुळे आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी त्याच्यामुळे 9 जणांना संसर्ग झाला होता. त्यात आणखी 4 जणांची भर पडली आहे. बेंगळूर शहर जिल्हय़ात आतापर्यंत 120 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 49 जण बरे झाले आहेत तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातच्या सुरत येथील 37 वर्षीय मौलवीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या 13 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 12 मार्च रोजी मौलवीसह 14 जण तुमकूरला आले होते. मात्र लॉकडाऊनमुळे सुरतला परत जाणे शक्य झाले नव्हते. मात्र मौलवीला कोणामुळे संसर्ग झाला याचा शोध आरोग्य खाते घेत आहे. चिक्कबळ्ळापूरमध्ये 39 वर्षीय व्यक्तीला तर मंडय़ा जिल्हय़ातील मळवळ्ळी येथील 60 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघेही संसर्गबाधितांच्या संपर्कात आले होते.