साहेब कृपा कोणाची?, नुसती सीआरपीसी नुसती नोटीस नको तर मुसक्या आवळा मुसक्या
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात दोन नंबरचे व्यवसाय उघडय़ा डोळय़ांनी दिसतात पण धडकपणे कारवाई करुन ते बंद करण्याचे धाडस पोलिसांच्यात नाही. कारवाई करायला गेले की कुठेतरी खुसपट निघते अन् किरकोळ जुजबी माल रिकव्हर केला जातो अन् सीआरपीसीची नुसती नोटीस देवून संबंधितास सोडण्यात येते. पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे दारुची विक्री जोमात अन् उघडपणे सुरु असते. सदरबाजारमध्ये लक्ष्मीच्या मंदिराच्या समोरच असलेल्या मोकळय़ा जागेत एक टपरी लागली असून त्या टपरीत उघड उघड दारु विक्रीचा कार्यक्रम सुरु आहे.
सातारा शहरात लक्ष्मी टेकडी परिसरात अनेक अवैध व्यवसाय सुरु आहेत. कोणी बेकायदेशीर दारुचा व्यवसाय करते तर बंद अवस्थेत असलेल्या घरकुलाच्या इमारतीवरच जुगाराचे डाव रंगतात. दारु कुठे मिळते हे या परिसरात सांगावे लागत नाही. रस्त्याच्या कडेलाच ओपन टपरीत दारुच्या बाटल्या विकताना दिसतात. त्यामुळे बोलायची कसलीच सोय नाही. साताऱयाला बिहारचीच अवकळा आली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या एक महिन्यांपासून लक्ष्मी टेकडीवर लक्ष्मी मंदिराच्या समोर मोकळया जागेत रस्त्याकडेला एक टपरी टाकण्यात आली असून या टपरीत दारुचा व्यवसाय सुरु असल्याची जोरदार चर्चा आहे. या दारुच्या गुत्यावर पोलिसांकडून कारवाई होत नाही. पाठीमागे किरकोळ जुजबी कारवाई केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या परिसरात नव्याने उघडपणे दारुची विक्री होत असून यावर कडक कारवाई करण्याचे धाडस सातारा पोलीस करतील काय असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
कायदा व सुव्यवस्था बिघडू लागली
सदरबाजार परिसरात सैनिक नगरच्या बाजूने गेल्यानंतर लक्ष्मी मंदिराच्या समोरच काही अंतरावर एका टपरीत बिनदिक्कतपणे राजरोसपणे दारु विक्री सुरु आहे. ही दारु विक्री कोणाच्या कृपेने सुरु आहे. त्यांच्यावरही कारवाई करुन हे कायमस्वरुपी हा व्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
सदरबाजारची पोलीस चौकी बिनकामाची
सदरबाजारची पोलीस चौकी ही तशी ऍक्टीव्ह समजली जाते. परंतु लक्ष्मी टेकडीवर कुठे दारुची विक्री होते कुठे, जुगार कोठे चालतो, मटका कोठे सुरु आहे याची सर्व माहिती आहे परंतु कारवाई कुठे दिसत नाही. पाठीमागे शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाई केली होती. त्यानंतर मात्र लक्ष्मी टेकडीवर कारवाई झाली नाही. त्यामुळे सदरबाजारची पोलीस चौकी बिनकामाची बनली आहे, अशीही या परिसरात चर्चा आहे.