‘राईस पुलर’च्या नादी लागणारे राव झाले रंक
प्रतिनिधी /बेळगाव
पैसा कोणाला नको असतो? पैसा असेल तरच जगणे ऐषोरामी बनते. म्हणून पैसा मिळविण्यासाठी प्रत्येकाची आपापल्या परीने धडपड सुरू असते. कोणी वैध मार्गाने पैसा मिळवितो तर आणखी कोणी त्यासाठी अवैध मार्गाचा अवलंब करतो. झटपट पैसा मिळविण्यासाठी अनेक मार्ग आहेत. यापैकी केवळ बेळगावच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रचलित आणि प्रभावी म्हणून ‘राईस पुलर’ हा प्रकार ओळखला जातो.
बेळगाव शहर व जिल्हय़ातील अनेक धनिक झटपट पैशाच्या मोहापायी व राईस पुलरच्या नादी लागून अक्षरशः कंगाल झाले आहेत. अनेक जण कर्जबाजारीही झाले आहेत. स्वतः दीड-दोनशे कामगार बाळगणाऱयांवर या राईस पुलरच्या मागे लागून स्वतःच मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. तरीही हा धंदा काही बंद झाला नाही.
बेळगाव शहरात राईस पुलर खरेदी-विक्रीचे अनेक प्रकार घडले आहेत. काही जण राईस पुलरची खरेदी करून फशी पडले आहेत तर आणखी काही जण व्यवहार होण्याआधीच पोलिसांच्या जाळय़ात अडकल्याची उदाहरणे आहेत. राईस पुलर हा प्रकारच मुळात फसवा आहे. तरीही जग त्याच्यामागे धावते आहे. इंटरनेटवर राईस पुलरची खरेदी व विक्री करणाऱयांची यादी पाहता या फसव्या धंद्यात किती जण गुंतले आहेत, याची कल्पना येते.
राईस पुलर या इंग्रजी शब्दाचा अर्थच तांदूळ ओढणारा असा होतो. मात्र, येथे तांदूळ म्हणजे ऐश्वर्य, संपत्ती वाढून भरभराट होणे असा आहे. त्याचा व्यवहारही मजेशीर होतो. एखाद्या हायफाय हॉटेलमध्ये खरेदी-विक्री करणाऱयांच्या बैठका होतात. राईस पुलर असली आहे की नकली? याची परीक्षा करणारेही यावेळी हजर असतात. जशी सोन्याची पारख केली जाते, तशीच राईस पुलरची पारख हे लोक करतात.
एखाद्ये तांब्याचे भांडे, जुने नाणे सावजाला दाखविले जाते. सामान्य तांब्याला चुंबकीय शक्ती नसते. जसे चुंबक लोखंडाला ओढून घेते तसे हे राईस पुलरचे तांब्याचे भांडे तांदूळ ओढून घेते, असे पटवून सांगितले जाते. या धातूला चुंबकीय शक्ती प्राप्त असते म्हणून कोटय़वधी रुपये किंमत ठरविली जाते. बेळगावमध्ये असे अनेक खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. काही वेळा तर खरेदीसाठी इचलकरंजी, कोल्हापूर येथील धनाढय़ व्यक्ती बेळगावला आल्याची उदाहरणे आहेत.
‘तेलही गेले, तूपही गेले….
बाजारात ‘आरपी’ या नावानेच राईस पुलरचा व्यवहार होतो. ज्याच्या घरी तांदूळ ओढून घेणारा धातू असतो, त्याची भरभराट होते, त्याची मालमत्तेची कमान चढती असते. जगातील सर्व सुख त्याच्या चरणी लोटांगण घालते, अशी जाहिरातबाजी केली जाते. या जाहिरातबाजीला भुलून अनेक जण शंभर रुपयांच्या भांडय़ाला कोटय़वधी रुपये मोजतात. नंतर त्यापासून काहीच लाभ न झाल्याने त्यांची अवस्था ‘तेलही गेले, तूपही गेले अन् हाती आले भांडे’ अशी होते.
एकेकाळी मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, बेंगळूर, नवी दिल्ली सारख्या मोठय़ा महानगरांमध्ये चालणारा हा गोरखधंदा आता बेळगाव, कोल्हापूर, इचलकरंजी सारख्या जिल्हा व तालुका पातळीवरही येऊन ठेपला आहे. एकदाचा गंडा घालून झाला की विक्री करणारे आपले फोन स्वीचऑफ करून गायब होतात. आपली भरभराट होईल या आशेने राईस पुलरचा धातू खरेदी करणारा रावाचा रंक झालेला असतो. एक-दीड वर्षापूर्वी बेळगावात असे अनेक प्रकार घडले आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे राईस पुलरचे व्यवहार इतर व्यवहारांप्रमाणेच थंडावले आहेत.
काय आहे राईस पुलर?
अनेकांना भिकेला लावणारा राईस पुलर म्हणजे एक धातू आहे. नाणे किंवा भांडय़ाच्या स्वरुपातील या धातूला कोटय़वधी रुपयांची बोली लावली जाते. उल्कापातावेळी हा धातू जमिनीवर पडतो. या धातूमध्ये तांदूळ आपल्याकडे खेचण्याची शक्ती असते. हे ज्यांच्या घरी असते त्यांची भरभराट होते, असे सांगत खरेदी करणाऱयाचीच वाट लावण्याचा हा फसवा धंदा आहे.