कोरोना संकटकाळात काही लोक देवदूत ठरले आहेत. असाच भोपाळमध्ये एक देवदूत आहे जावेद. रिक्षाचालक असलेल्या जावेदने स्वतःच्या रिक्षाचे रुग्णवाहिकेत रुपांतर केले आहे.
मार्च महिन्यात रिक्षाचा व्यवसाय ठप्प पडला. अशा स्थितीत लोकांची मदत कशी करू असा विचार करू लागलो. टीव्हीवर एका रुग्णवाहिकेने रुग्णाकडे पैसे नसल्याने त्याला नेण्यास नकार दिल्याचे पाहिले आणि मला धक्काच बसला. कुणी आईवडिलांना खांद्यांवरून नेत होता, कुणी वाटेत कोसळले होते. अशा स्थितीत माझ्या रिक्षाला रुग्णवाहिकेत बदलण्याचा निर्णय घेतल्याचे तो सांगतो.
दुसऱया दिवशी 24 तास माझी रिक्षा रुग्णवाहिका लोकांना मोफत मदत करणार असल्याचे जाहीर केले. मी कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत तडजोड करू शकत नाही, याचमुळे त्यांना नातेवाईकांकडे पाठविले. पुढील 2 आठवडय़ांमध्ये 150 लोकांना रुग्णालयात हलविले. या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे कळल्यावर माझी सोन्याची चैन विकून ऑक्सिजन सिलिंडर बसविला. पैसे येत-जात राहतील, त्याचा विचार करत नसल्याचे जावेदने म्हटले आहे.
सर्वोत्तम प्रयत्न करतोय
कधीकधी 2-3 जण एकाचवेळी कॉल करतात, मग मला त्यांच्या अडचणींनुसार कुणाला प्रथम मदत करायची हे ठरवावे लागते. मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. मागील महिन्यात 300 जणांना मदत केली आहे. लोक कोरोना रुग्णांमुळे भीती वाटत नाही का अशी विचारणा करताता ही घाबरण्याची नव्हे तर कोरोनाला घाबरविण्याची वेळ असल्याचे त्यांना सांगतो असे उद्गार जावेदने काढले आहेत.