तिसरी व शेवटची कसोटी : पंतच्या झुंझार शतकानंतरही भारताचा 198 धावांत खुर्दा, द. आफ्रिकेची 2 बाद 101 धावांपर्यंत मजल
वृत्तसंस्था /केपटाऊन
यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या (नाबाद 100) झुंझार शतकानंतरही येथील तिसऱया कसोटी सामन्यात दुसरा डाव 198 धावांवर खुर्दा झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला असून यजमान दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुरुवारी सामन्याच्या तिसऱया दिवशी 2 बाद 101 धावांची जोरदार मजल मारली.
रिषभ पंतने 139 चेंडूत 6 चौकार व 4 षटकारांसह विदेशातील आपले चौथे शतक साजरे करत प्रतिकूल परिस्थितीत कशी फलंदाजी करावी, याची प्रचिती आणून दिली. पण, काही प्रमाणात विराट (29) वगळता अन्य फलंदाजांनी हाराकिरीच केली आणि दुसऱया कसोटीप्रमाणे येथेही भारतीय संघ बिकट परिस्थितीत
सापडला.
यजमान द. आफ्रिकेला या निर्णायक तिसऱया कसोटीसह मालिका जिंकण्यासाठी आता अद्याप 111 धावांची गरज असून त्यांचे 8 बळी बाकी आहेत. भारतीय गोलंदाजांना मात्र विजय खेचून आणण्यासाठी अनुभव पणाला लावावा लागेल. शिवाय, सुदैवाची साथ लाभण्याची अपेक्षाही करावी लागणार आहे.
रिषभ पंतचे झुंझार शतक, पण…
दिवसाच्या प्रारंभी, चहापानापर्यंतच्या सत्रात रिषभचे प्रतिकूल स्थितीतील शतक विशेष दाद मिळवून गेले. मात्र, अन्य सहकारी फलंदाजांची हाराकिरी पुन्हा एकदा नडली आणि भारताला सर्वबाद 212 धावांचे संरक्षण करणे भाग असेल, हे सुस्पष्ट झाले. भारताच्या सर्वबाद 198 धावात 50 टक्के वाटा एकटय़ा रिषभ पंतचा ठरला. मैदानी पंचांनी भारताचा शेवटचा गडी बाद झाल्यानंतर चहापानासाठी खेळ
थांबवला.
यापूर्वी, फटक्यांची निवड चुकत असल्याने टीकेचे लक्ष्य ठरत असलेल्या रिषभ पंतने बिनचूक फटक्यांच्या आतषबाजीवर शानदार शतक झळकावणे अर्थातच वैशिष्टय़पूर्ण होते. त्याने कॅगिसो रबाडाला (3-53) स्क्वेअरकटचा लगावलेला फटका लक्षवेधी होता. याशिवाय, डय़ुआन ऑलिव्हिएरला पुढे सरसावत खेचलेला कव्हर ड्राईव्ह आणि केशव महाराजला लाँगऑनच्या दिशेने खेचलेला षटकार निव्वळ प्रेक्षणीय ठरला. काही उत्तम चेंडूंना तटवत त्याने संयमाचा देखील उत्तम दाखला दिला. अर्थात, खराब चेंडूंचा समाचार घेण्यात पंत अजिबात मागे नव्हता. त्याने केशव महाराजला स्लॉग स्वीप फटक्यावर आणि लाँगऑफच्या दिशेने षटकारासाठी फटकावणे लक्षवेधी होते. आपल्या शतकी खेळीत त्याने 6 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली.
कर्णधार विराट कोहलीने केवळ 29 धावांचे योगदान दिले असले तरी क्रीझवर असताना त्याने पंतला दिलेले टीप्स विशेष महत्त्वाचे ठरले. एकदा तळाचे फलंदाज येण्यास सुरुवात झाल्यानंतर पंतने चौथ्या, पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यावर भर दिला. एकीकडे, पंतने आपल्या अपयशावरुन उत्तम बोध घेतला असल्याचे त्याच्या या शतकी डावावरुन संकेत मिळाले असले तरी चेतेश्वर पुजारा (9) व अजिंक्य रहाणे (1) या जोडीने मात्र या मोक्याच्या क्षणीही पुन्हा एकदा निराशाच केली.
पुजारा लेग साईडला फटका मारण्याच्या प्रयत्नात लेग स्लिपकडे कीगन पीटरसनकडे सोपा झेल देत तंबूत परतला. कीगनने आपल्या उजव्या बाजूला झेपावत जमिनीपासून अगदी काही इंचावरुन उत्तम झेल टिपला. रबाडाने एका अप्रतिम जलद चेंडूवर रहाणेला पहिल्या स्लीपमधील एल्गारकरवी झेलबाद केले.
नंतर विजयासाठी 212 धावांचे आव्हान असताना दक्षिण आफ्रिकेने प्रत्युत्तरात 29.4 षटकात 2 बाद 101 धावांची मजल मारली. एल्गार दुसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी खेळ थांबवण्यात आला. किगन पीटरसन 61 चेंडूत 48 धावांवर खेळत होता.
145 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 20 फलंदाज झेलबाद!
भारताच्या पहिल्या डावात व दुसऱया डावात सर्वही फलंदाज झेलबाद झाले आणि कसोटी क्रिकेटमधील 145 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही एकाच संघाचे वीसही फलंदाज झेलबाद होण्याचा आगळा विक्रम येथे नोंदवला गेला.
मैदानी पंचांनी बाद दिल्यानंतरही एल्गार बचावला!
गुरुवारी दिवसभरातील उत्तरार्धात अश्विनच्या गोलंदाजीवर एल्गारला पंचांनी पायचीत दिले होते. पण, एल्गारने डीआरएस घेतला आणि रिप्लेत चेंडू यष्टीच्या वरुन जात असल्याचे स्पष्ट झाल्याने एल्गार थोडक्यात बचावला. तिसऱया पंचांच्या या निर्णयावर भारतीय कर्णधार विराटने मैदानावरच तीव्र नापसंती व्यक्त केली.
भारताचे 8 फलंदाज एकेरी धावेत गारद, हाच खरा टर्निंग पॉईंट!
यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (नाबाद 100), कर्णधार विराट कोहली (29) व केएल राहुल (10) यांचा अपवाद वगळता भारताच्या तब्बल 8 फलंदाजांना अगदी दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही आणि यानंतर संघाचा दुसरा डाव स्वस्तात संपुष्टात आला, यात आश्चर्याचे काहीच कारण नव्हते. मयांक (7), पुजारा (9), रहाणे (1), अश्विन (7), शार्दुल (5), उमेश यादव (0), शमी (0), बुमराह (2) असे भारताचे तब्बल 8 फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत.
सत्रनिहाय खेळावर दृष्टिक्षेप
- सत्र षटके धावा बळी सरासरी
- पहिले 26 73 2 2.81
- दुसरे 24.3 68 6 2.78
- तिसरे 29.4 101 2 3.40
धावफलक
भारत पहिला डाव : सर्वबाद 223.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव : सर्वबाद 210.
भारत दुसरा डाव ः केएल राहुल झे. मॅरक्रम, गो. जान्सन 10 (22 चेंडूत 2 चौकार), मयांक अगरवाल झे. एल्गार, गो. रबाडा 7 (15 चेंडूत 1 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. पीटरसन, गो. जान्सन 9 (33 चेंडूत 2 चौकार), विराट कोहली झे. मॅरक्रम, गो. एन्गिडी 29 (143 चेंडूत 4 चौकार), अजिंक्य रहाणे झे. एल्गार, गो. रबाडा 1 (9 चेंडू), रिषभ पंत नाबाद 100 (139 चेंडूत 6 चौकार, 4 षटकार), रविचंद्रन अश्विन झे. जान्सन, गो. एन्गिडी 7 (15 चेंडूत 1 चौकार), शार्दुल ठाकुर झे. व्हेरेन, गो. एन्गिडी 5 (13 चेंडूत 1 चौकार), उमेश यादव झे. व्हेरेन, गो. रबाडा 0 (10 चेंडू), मोहम्मद शमी झे. डय़ुसेन, गो. जान्सन 0 (10 चेंडू), बुमराह झे. बवूमा, गो. जान्सन 2 (5 चेंडू). अवांतर 28. एकूण 67.3 षटकात सर्वबाद 198.
गडी बाद होण्याचा क्रम
1-20 (मयांक, 4.5), 2-24 (केएल राहुल, 5.5), 3-57 (पुजारा, 17.2), 4-58 (रहाणे, 18.6), 5-152 (विराट, 48.2), 6-162 (अश्विन, 52.3), 7-170 (शार्दुल, 56.1), 8-180 (उमेश यादव, 58.5), 9-189 (शमी, 63.6), 10-198 (बुमराह, 67.3).
गोलंदाजी
रबाडा 17-5-53-3, ऑलिव्हिएर 10-1-38-0, जान्सन 19.3-6-36-4, एन्गिडी 14-5-21-3, केशव महाराज 7-1-33-0.
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव : एडन मॅरक्रम झे. राहुल, गो. शमी 16 (22 चेंडूत 4 चौकार), डीन एल्गार झे. पंत, गो. बुमराह 30 (96 चेंडूत 3 चौकार), कीगन पीटरसन खेळत आहे 48 (61 चेंडूत 7 चौकार). अवांतर 7. एकूण 29.4 षटकात 2 बाद 101.
गडी बाद होण्याचा क्रम
1-23 (मॅरक्रम, 7.3), 2-101 (एल्गार, 29.4).
गोलंदाजी
बुमराह 9.4-3-29-1, शमी 7-0-22-1, उमेश यादव 2-0-5-0, शार्दुल 5-1-17-0, अश्विन 6-1-22-0.