भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांना विश्वास
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीचे निकाल पाहता आगामी विधानसभा निवडणूक मोठय़ा बहुमताने जिंकणार अशी खात्री भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी प्रकट केली. गोवा राज्यातील जनतेच्या आशा पूर्ण करण्यास भाजप यशस्वी होईल आणि कसोटीत उतरेल, असेही ते म्हणाले.
पणजीतील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, गोव्याच्या एकंदरित विकासाचा दरवाजा भाजप सरकारने खुला केला असून ‘सबका विकास – सबका साथ – सबका विश्वास’ हे ब्रीदवाक्य घेऊन भाजप पुढे जात आहे आणि पक्षाला यश मिळत आहे. जनता काँग्रेसला नाकारत असून आपली मते भाजपच्या पारडय़ात टाकत आहे. त्यातून जनतेला काँग्रेसचे सरकार नको तर भाजपचे सरकारच हवे असल्याचे दिसून येते, असा दावा हुसेन यांनी केला.
काँग्रेस पक्ष आता संपल्यात जमा असून त्या पक्षाला आता विरोधी पक्षाचाही दर्जा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. जि. पं. निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांनी भाजप – गोवा प्रदेशचे अभिनंदन केले.
दुसऱया पक्षांतून आलेलेही भाजप उमेदवारीवर विजयी होतात
दुसऱया पक्षातून जे भाजपमध्ये आले त्यांचा सन्मान केला जातो म्हणूनच तर ते भाजपच्या उमेदवारीवरच विजयी होत आहेत. आंधप्रदेश, उत्तरप्रदेश व इतर काही राज्यात त्याची चुणूक भाजपने दाखविली असून तीच विजयी परंपरा गोव्यातही यापुढील निवडणुकीत कायम राहणार असल्याचे हुसेन यांनी नमूद केले.