वृत्तसंस्था/ कीव्ह, युक्रेन
भारताची स्टार महिला मल्ल विनेश फोगटने 2017 ची वर्ल्ड चॅम्पियन व्ही. कलादझिन्स्कायला अंतिम फेरीत पराभवाचा धक्का देत आऊटस्टॅडिंग युक्रेनियन रेसलर्स व केचेस मेमोरियल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. कोरोना व्हायरसच्या दीर्घ ब्रेकनंतर पहिल्याच स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करीत तिने आंतरराष्ट्रीय पुनरागमन झोकात साजरे केले.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱया बेलारुसच्या कलादझिन्स्कायचे मोठे आव्हान तिसऱया मानांकित विनेशपुढे होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या 53 किलो गटातील या लढतीत दोघीही एकमेकीवर आक्रमण करीत होत्या. पारडे सतत एकमेकीकडे झुकत होते. पण अखेरीस विनेशनेच त्यात बाजी मारत जेतेपद पटकावले. विनेशने सुरुवातीलाच जोरदार आक्रमण करीत 4-0 अशी आघाडी घेतली, पण कलादझिन्स्कायने लवकरच तिच्याशी 4-4 अशी बरोबरी साधली. ब्रेकच्या वेळी विनेशने 6-4 अशी आघाडी होती. बेकच्या 10 सेकंद आधी विनेशने तिला खाली घेतल्याने तिला हे गुण मिळाले होते. मात्र नंतर कलादझिन्स्कायने थ्रो करीत एकदम चार गुण घेत विनेशवर दडपण आणले होते. पण 25 सेकंद बाकी असताना विनेशनेही चपळ हालचाली करीत 4 गुण वसूल करून 10-8 अशी आघाडी घेतली. कलादझिन्स्कायला खाली घेण्याची संधी मिळाल्यावर विनेशने त्याचा लाभ घेत सुवर्णपदक निश्चित केले.
गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे जगभरातील सर्वच खेळ थांबवण्यात आले होते. हळूहळू खेळ सुरू झाल्यानंतर विनेशने भाग घेतलेली ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची ती एकमेव महिला मल्ल आहे. तिच्या बचावाबद्दल विचारले असता तिचे बेल्जियन प्रशिक्षक वोलर अकोस यांनी तिच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत बोलेन, असे सांगितले. इटलीतील मॅटेव पेलिकोन येथे यूडब्ल्यूडब्ल्यू मानांकन मालिकेतील स्पर्धेत ती आता भाग घेणार आहे. 4 मार्चपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत टोकियोसाठी पात्र ठरलेले बजरंग पुनिया व रवि दाहिया हे पुरुष मल्लही भाग घेणार आहेत.