मुख्यमंत्री बोम्माई यांची अधिकाऱयांना सूचना : ऊर्जा खात्याची घेतली प्रगती आढावा बैठक
प्रतिनिधी /बेंगळूर
वीजनिर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्याबरोबरच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दूरदृष्टीकोन ठेवून कामे करावीत, अशी सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी ऊर्जा खात्यातील अधिकाऱयांना दिली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच बुधवारी ऊर्जा खात्यातील अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी खात्यातील कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला.
वीजनिर्मिती आणि त्याचा पुरवठा आणखी चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे. आवश्यकता आणि मागणीला अनुसरून वीजनिर्मिती करावी. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील परिस्थती जाणून घेऊन जादा दराने वीजविक्री करावी. कर्नाटक वीज विद्युत निगमकडून वीजनिर्मिती अत्यंत दक्षतेने व्हावी. वीज उत्पादन केंद्रांची कार्यक्षमता आणखी वाढविणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘गंगा कल्याण’च्या कूपनलिकांना विनाविलंब वीज कनेक्शन द्या
गंगा कल्याण योजनेंतर्गत राज्यात खोदण्यात आलेल्या कूपनलिकांना विनाविलंब वीज कनेक्शन द्यावे. कोरोना काळात विशेषतः हॉस्पिटलना कोणत्याही प्रकारणे अडथळे उद्भवणार नाहीत, अशा तऱहेने वीजपुरवठा करा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा खात्यातील अधिकाऱयांना दिली.
ग्रामीण भागात 7 तास वीज द्या
राज्यातील केवळ 15 जिल्हय़ांमधील ग्रामीण जनतेला 7 तास सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे. उर्वरित जिल्हय़ांमध्ये 5 तास देखील सुरळीत वीजपुरवठा होत नाही. ही विषमता दूर करण्यासाठी नील नकाशा तयार करून लवकरात लवकर उर्वरित भागांनाही 7 तास वीजपुरवठा करा. वीजगळती रोखण्यासाठी कामकाजात आणखी सुधारणा करा. राज्यात पुनउ&पयोगी ऊर्जा स्रोतांद्वारे 15,184.13 मे. वॅट वीजनिर्मिती केली जात असून कर्नाटक राज्य देशात आघाडीवर आहे. भविष्यातील मागणीचा विचार करून पुनउ&पयोगी उर्जेला अधिक प्राधान्य द्यावे, असा सल्लाही मुख्यमंत्री बोम्माई यांनी अधिकाऱयांना दिला.
18,569 कूपनलिकांना वीज कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट
गंगा कल्याण योजनेंतर्गत यंदा एकूण 18,569 कूपनलिकांना वीज कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. प्रत्येक पंपसेटसाठी खर्च म्हणून दिली जाणारी रक्कम 50 हजार रुपयांवरून 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी आहे. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.