हैदराबादच्या सैदाबादमध्ये 8 वीच्या विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर वृक्षतोड करणाऱया एका व्यक्तीवर 62,075 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विद्यार्थ्याने तेलंगणा वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून कडुलिंबाचे झाड तोडण्यात आल्याची माहिती दिली होती.
पहाटे 4 वाजता फोन
पहाटे 4 वाजता मुलाने आमच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून एक झाड तोडल्यावर त्याचे लाकुड गाडीत भरले जात असल्याची माहिती दिली होती. वन विभागाने त्वरित कारवाई करत विनाअनुमती वृक्षतोड करणाऱया जी. संतोष रेड्डी नावाच्या व्यक्तीला दंड ठोठावल्याची माहिती हैदराबादचे विभागीय वन अधिकारी सी.एच. व्यंकटया गौड यांनी दिली आहे.
घटनास्थळी मिळाले पुरावे
तक्रार मिळताच गौड, वन विभागाचे अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी वृक्षतोड करण्यासाठी वापरली जाणारे अवजारे तसेच झाडाचे अवशेष मिळाले होते. संबंधित मुलाने तक्रार करताना स्वतःची ओळख उघड केली नव्हती.