वेंगुर्ले /वार्ताहर-
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा समोरील भागात एल.ई.डी. लाईटदारे पर्सनेटच्या वापरातून मासेमारी करणारा ट्रॉलर्स मत्स्य विभागाच्या पथकाने आज रविवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारांस रंगेहाथ पकडला. त्यावर पकडण्यांत आलेल्या मासळीचा लिलाव 2,83,000 एवढा झाला आहे. याप्रकरणी उद्या सोमवारी मालवण येथील सहाय्यक मlस्य आयुक्तांकडे कारवाईसाठी हे प्रकरण सादर करण्यांत येणार असल्याची माहिती वेंगुर्लेचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी दिली.
वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रात मोठय़ा प्रमांणात एल.ईडी. लाईटव्दारे पर्सनेट नौका मासमारी करत असल्याच्या मच्छिमारांच्या तक्रारीनुसार शासनाच्या शितल या गस्ती नौकेव्दारे वेंगुर्लेचे मत्स्यखात्याचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी मालवणचे अंमलबाजावणी अधिकारी विकास अधिकारी विजय देवकर, सागरी सुरक्षा रक्षक राजेश कुबल, हर्षद टाक्कर (दोन्ही वेंगुर्ले), शुभंम राऊळ, दिवाकर जुवाटकर (दोन्ही मालवण), तसेच शितल गस्ती नौकेचे तांडेल संजय चिंदरकर व श्री. पाटील, कर्मचारी श्री. पडवळ, श्री. पेडणेकर व राजपुत या पथका समवेत शनिवारी रात्री पासून वेंगुर्लेच्या समुद्रात शितल गस्ती नौकेव्दारे गस्त सुरू केली. पहाटे 4.30 वाजण्याचा सुमारांस गोवा राज्यातील सी-लॉर्ड-आय.एन.डी-जी.ए.-01-एम.एम.-962 हा ट्रॉलर्स एल..ई.टी. लाईटच्या वापरातून पर्सनेटव्दारे मासेमारी करत असताना रंगेहाथ सापडला. या ट्रॉलर्सला वेंगुर्लेत बंदरात आणण्यात आले. त्यावर खडकातील सापडलेली कोकर, तुमरस, कळवी यांसह विविध प्रकारच्या मासळीचा लिलाव करण्यांत आला. सदर लिलावाची किंमत 2,83.000/- एवढी झाली आहे.
या प्रकरणी उद्या सोमवारी मालवण येथील सहाय्यक मत्स्यआयुक्त यांच्या कोर्टात हे प्रकरण महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 च्या सुधारित 23 नोव्हेंबर 2021 नुसार करण्यांत आलेल्या मासेमारी कायद्यानुसार सादर करण्यांत येणार असल्याची माहिती वेंगुर्लेचे अंमलबजावणी अधिकारी चिन्मय जोशी यांनी दिली.