मुख्यमंत्र्यांनीच आदेश काढला असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी केले स्पष्ट
प्रतिनिधी/सातारा
ब्रेक द चेनला साताऱयाच्या व्यापाऱयांनी पहिल्या दिवशी विरोध केला हेता. दुसऱया दिवशी बुधवारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेवून आपली कैफियत त्यांनी मांडाली. नियम पाळून शहरातील व्यापाऱयांना दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली त्यावेळी पदाधिकाऱयांना जिल्हाधिकाऱयांनी हा निर्णय माझा नाही तर मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. तुमची मागणी त्यांच्यापर्यंत कळवतो, असे आश्वासन दिले.
व्यापाऱयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ब्रेक द चेन अंतर्गत या आदेशानुसार काही व्यापारी क्षेत्रावरच परिणाम होत आहे. अत्याश्यक सेवेची दुकाने वगळता बाजारपेठेत इतरत्रही आस्थापना आहेत. त्यात अनेक छोटेमोठे व्यापारी आहेत. त्यांनी आपले व्यवसाय सुरु करताना अनेक बँकांची कर्जे घेतलेली आहेत. तसेच आगामी सणासुदीच्या पार्श्वभुमीवर माल भरलेला आहे. गेले वर्षभर कोरोनाचा सामना करताना या क्षेत्रातील अनेकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या अनेक लोकांना रोजीरोटीला मुकावे लागले आहे. ही वस्तुस्थिती आहे. नुकतेच कुठेतरी राज्यातील सर्वच क्षेत्रातील अर्थचक्र हळूहळु पूर्वपदावर येवू लागले असतानाच राज्य सरकारने ब्रेक द चेन हा मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठराविक क्षेत्रातील अर्थचक्राला खीळ बसणार आहे. त्यावर अवलंबून असणाऱया हजारो लोकांचे हाल होणार आहे.
आम्ही व्यापारी महासंघाच्यावतीने विनंती करतो की, अत्यावश्यक सेवांच्या वेळेप्रमाणेच राज्यातील इतर आस्थापनांही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी. राज्य शासनाच्या धोरणानुसार शहरातील सर्व व्यापाऱयांनी कुटुंबियाचे लसीकरण केले आहे. अजून लसीकरण करण्यास व्यापारी महासंघ तयार आहे. शासनाने कोणतीही वयाची अट न ठेवता लस उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी वैद्यकीय सुविधा सोडून इतर सर्व यंत्रणा देण्यात व्यापारी महासंघ तयार आहे. तरी राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे अर्थचक्र सुरळीत ठेवण्यासाठी सातारा शहरातील सर्वच दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, आम्ही शासनाचे सर्व नियम पाळू, अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदनावर शहर कापड संघटना, शहर सराफ असोसिएशन, शहर प्लायवुड व हार्डवेअर संघटना, शहर मुद्रांक संघटना, शहर स्टेशनरी विक्रेते संघटना, शहर भांडी व्यापारी संघटना, शहर चर्मकार संघटना, शहर नाभिक संघटना, शहर किराणा असोसिएशन, शहर मंडप व्यावसायिक संघटना, शहर केटरिंग संघटना, शहर मोबाईल व्यापारी संघटना, शहर हॉटेल संघटना, शहर सॅनिटेरी व्यापारी संघटना, शहर लोखंड व पत्रा व्यापारी संघटना, शहर लॉण्ड्री असोशिएशन, सातारा शहर रंग व्यापारी संघटना, शहर बिल्डर असोसिएशन, शहर टाईल्स व्यापारी संघटना यांच्यावतीने सुदीप भट्टड, शेखर घोडके, प्रशांत मोदी, संजय कासट, महेश लोहया, पंकज लाहोटी आदी उपस्थित होते.