प्रतिनिधी /वास्को
येत्या शनिवारपासून सुरू होणाऱया श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या निमित्ताने गोव्यातील भाविकानी मंदिराजवळ न येता घरी बसल्या आभासी पद्धतीने श्री दामोदराचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री दामोदर भजनी सप्ताह कार्यकारी समितीचे प्रमुख प्रशांत जोशी यांनी केले आहे.
यासंबंधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जोशी म्हणाले की, गोव्यातील कोरोना महामारीचे सावट अजूनही कायम असून त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताह हा गोव्यातील मोठय़ा प्रमाणात साजरा केला जाणार उत्सव असल्याने दरवर्षी देवाच्या दर्शनासाठी मोठय़ा संख्येने भाविक मंदिराकडे दाखल होतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग असलेली एखादी व्यक्ती मंदिराच्या ठिकाणी आल्यास कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात फैलाव होण्याचा धोका आहे.
मागच्या वर्षी श्री दामोदर भजनी सप्ताह कोणताही गाजावाजा न करता साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. यंदाही त्याच पद्धतीने सप्ताहाचे आयोजन होणार असल्याची माहिती श्री. जोशी यावेळी दिली. शनिवारी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दुपारी बारा वाजता सरकारी नियमानुसार केवळ पंधरा जणांच्या उपस्थितीत श्रीफळ ठेवून भजनाला सुरवात केली जाणार आहे. त्यानंतर आठ भजनी कलाकारांच्या उपस्थितीत भजनाची सुरवात होईल व लगेच भजनाची सांगता होईल. त्यानंतर पुढील चोवीस तास अखंडितपणे मंदिरामध्ये चालू राहणारे भजन यंदा आभासी पद्धतीने फेसबूक व युटय़ूबच्या माध्यमाद्वारे भाविकांसाठी प्रसारीत केले जाणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. पुढील दोन दिवस मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करू नये यासाठी मंदिराच्या समोरील स्वातंत्र्यपथ मार्गावर पत्र्यांचे कुंपण उभारले जाणार आहे.
मागच्या वर्षांप्रमाणे यंदाही विविध समाजातर्फे मंदिराकडे मार्गस्थ होणार पार असणार नाहीत. त्याऐवजी प्रत्येक गटातील तीन प्रतिनिधीना दुपारी अर्ध्या तासाच्या अंतराने तळी घेऊन मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सप्ताहाच्या काळात केवळ ओळख पत्र देण्यात आलेल्या व्यक्तीनाच मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे श्री. जोशी यांनी यावेळी सांगितले. उत्सव समितीचे सचिव संतोष खोर्जुवेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सप्ताहाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी दुपारी बारा ते दोन पर्यंत मंदिरामध्ये होणाऱया धार्मिक विधींचे सामाजिक माध्यमाद्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मंदिरातील भजन भाविकांना घरी बसल्या पाहता यावे यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर व खजिनदार विष्णू गारूडी उपस्थित होते.