मँचेस्टर : इंग्लंड व पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी शेवटची बातमी हाती आली तेव्हा पाकने पहिल्या डावात 86 षटकांत 5 बाद 244 धावा जमविल्या होत्या. शान मसूदने शतक नोंदवले तर शादाब खान 34 धावांवर त्याला साथ देत होता. याशिवाय बाबर आझमने 69 धावा
जमविल्या.
पहिल्या दिवशी चहापानाच्या सुमारास पावसाचा व्यत्यय आल्याने केवळ 49 षटकांचाच खेळ होऊ शकला होता. त्यात पाकने 2 बाद 139 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून पाकने दुसऱया दिवसाच्या खेळाला सुरुवात केली आणि उपाहारापर्यंत आणखी तीन बळी गमवित 5 बाद 187 धावांपर्यंत मजल मारली होती. सकाळच्या सत्रात इंग्लंडच्या अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड या वेगवान जोडीने भेदक मारा करीत पाकवर दडपण आणले होते. दिवसातील पहिल्याच षटकात अर्धशतकवीर बाबर आझमला अँडरसनने रूटकरवी झेलबाद केले. आझमने 106 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 69 धावा जमविल्या. कालच्या धावसंख्येत त्याला काहीही भर घालता आली नाही. त्याने मसूदसमवेत तिसऱया गडय़ासाठी 96 धावांची भागीदारी केली.