फोटो कोलाजद्वारे नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन : भंडारी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम
वार्ताहर / मालवण:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी, यासाठी भंडारी हायस्कूलच्या 2010-11 या कालावधीतील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी फोटो कोलाजद्वारे नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन मालवणी भाषेतून केले आहे.
भंडारी हायस्कूलच्या 2010-11 कालावधीतील विद्यार्थी सध्या नोकरीनिमित्त बाहेर आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी व्हॉट्स ऍप ग्रुप बनविला. या ग्रुपवर विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करणारा फोटो कोलाज बनविण्याचे ठरविले.
मालवणी भाषेतून संदेश
‘माका काय होना नाय म्हणान उगाच चौकात उभे रव्हान फुकटची शायनिंग मारू नको. योग्य ती काळजी घेवा. शायनिंग मारूक ती करीना नाय हा, कोरोना हा!’ असा मालवणी भाषेतून संदेश तयार करून फोटो कोलाजद्वारे सोशल मीडियावर प्रसारित केला. या उपक्रमामध्ये सुविधा कासले, प्रज्ञा चौलकर, सदाशिव घाडीगावकर, श्रीया ओरसकर, गीतेश गावठे, नेत्रा सारंग, जयंत पाटकर, प्रतीक्षा कदम, अक्षय मसुरकर, स्नेहा भोवर, दुलार ढोके, प्राजक्ता लाड, सायली सावजी, सिद्धेश चव्हाण, मॅलिटा डिसोजा, शैलजा कदम या माजी विद्यार्थ्यांनी फोटो कोलाजद्वारे नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.