दोन आरोपी निष्पन्न – एक अल्पवयीन कालच ताब्यात
प्रतिनिधी/ सातारा
शाहूपुरी ते कोंडवे रस्त्यावर असलेल्या दिव्यनगरी परिसरात झालेल्या इस्टेट एंजट संतोष उर्फ विठ्ठल जिजाबा सूळ वय 43 रा. आवाडवाडी, आंबेदरे, ता. सातारा याच्या खून प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी जीवन चंद्रकांत निकम (वय 30 रा. आंबेदरे, ता. सातारा) याला शनिवारी अटक केली असून त्याला उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संतोष सूळ याची व संशयितांची जमीन व्यवहार व पैशाच्या देवाण, घेवाणीतून भांडणे झाल्याचे समोर आले असून त्यातून त्यांच्यातील भांडणे वाढत जावून त्याचे पर्यावरण मारामारीत झाले. त्यावेळी दगडाने मारहाण करण्यात आल्याने संतोष सूळ गंभीर जखमी झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असताना त्याने त्याचा भाऊ ज्ञानेश्वर याला जीवन निकम व प्रमोद जाधव यांनी मारहाण केली असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सातारा तालुका पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर सूळ यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. पोलिसांना शुक्रवारी अल्पवयीन संशयित ताब्यात घेण्यात यश मिळाले. मात्र, जीवन निकम हा फरार झाला होता. शनिवारी त्याला देखील अटक करण्यात आली असल्याची माहिती या गुन्हय़ाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांनी दिली.