प्रतिनिधी / बेगळूर
कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात असलेल्या राज्यातील 10 जिल्हय़ांमध्ये 100 टक्के वैद्यकीय तपासणी केंद्रे सुरु करण्याचा विचार आहे, अशी माहिती कोविड वॉर रुम आणि कोविड केअर सेंटरची जबाबदारी असणारे मंत्री अरविंद लिंबावळी यांनी दिली.
बेंगळूरमधील मागडी रोड येथील आरोग्यसौधमध्ये 10 जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी, महापालिका-नगरपालिका आयुक्त आणि जिल्हा आरोग्याधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. कोरोना नियंत्रणाची कामे आणखी परिणामकारी होण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात विशेषतः शहरी भागात वॉर्डनिहाय वैद्यकीय तपासणी केंद्रे सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनांची मते विचारत घेणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
जिल्हा पातळीवर वैद्यकीय तपासणी केंद्रे स्थापन करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता पडताळून याविषयी माहिती द्यावी, अशी सूचना मंत्री अरविंद लिंबावळी यांनी अधिकाऱयांना दिली. फिरते तपासणी केंद्र सुरू करण्याचा सल्ला अनेक जिल्हा प्रशासनांनी दिला असून याबाबत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, दावणगेरे, मंगळूर, कोडगू, उडुपी, शिमोगा आणि मंडय़ा जिल्हय़ांचे अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.