प्रशासन, पोलिसांकडून तयारी सुरू, लोकशाहीचा पुन्हा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
लोकशाही मार्गाने म. ए. समितीने मराठा मंदिर येथे काळय़ादिनी सभा घेतली. त्या ठिकाणी सत्याग्रह केला. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या प्रशासनाने आणि पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे घालण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाषण केलेले व्हिडीओ तयार करुन त्यामध्ये आक्षेपार्ह आहे का? कोणता गुन्हा दाखल करता येईल, याची चाचपणी सुरू झाली आहे. टिळकवाडी पोलिसांनी काही सरकारी वकिलांकडे जाऊन याची चौकशी केल्याचे बोलले जात आहे.
मराठी बहुल असलेला सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. तेव्हापासून सीमाभागामध्ये 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून गांभीर्याने पाळला जातो. त्या दिवशी मराठी भाषिक आपले व्यवहार बंद करुन केंद्र सरकारचा निषेध करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून दडपशाही करत हा लढा चिरडण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे. नुकत्याच झालेल्या 1 नोव्हेंबर रोजी काही नेत्यांच्या घरासमोरच पोलिसांनी त्यांना अडविले होते. मात्र लोकशाही मार्गाने आम्ही हा लढा देत आहे. हवे तर तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा, असे सांगून अनेक जण बाहेर पडले. सोमवारी अनेक ठिकाणी पोलिसांनी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि मराठी भाषिकांनी 1 नोव्हेंबर काळा दिन यशस्वी करुन दाखविला. त्यामुळे पोलिसांनी आता म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर गुन्हे घालण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कशा प्रकारे आणि कोणते गुन्हे घालता येतील, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहेत. टिळकवाडी पोलिसांनी याबाबत सरकारी वकिलांच्याबरोबर चर्चा देखील केली आहे. मात्र सरकारी वकिलांनी समितीच्या नेत्यांवर गुन्हे घालता येणार नाहीत, असे सांगितले आहे.