गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विकास भगत यांचा आरोप
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री आणि आमदारांनी आपल्या उमेदवारांना तसेच आपल्या खास माणसांना साबांखा पदे विकली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरी प्रक्रिया हा मोठा घोटाळा आहे. ही गोष्ट लवकरात लवकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पोहचविण्यात येणार आहे. भाजप सरकार हे भ्रष्टाचारी, बेईमान सरकार आहे. योग्य गोमंतकीय युवांना नोकरी न देता अयोग्य उमेदवारांना नोकरी देऊन अन्याय केला आहे असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विकास भगत यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
मागील दिवसात सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी घोटाळा झाला. यात ज्या उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यांची कशाप्रकारे निवड करण्यात आली याविषयी चौकशी करून माहिती तयार केली. निवडलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर मारली तर त्यावरून राजकीय हस्तक्षेप करून निवड करण्यात आली. टीआयटी जे तात्पुरते कर्मचारी आहेत त्यांची फाईल नूतनीकरण 31 जानेवारीपूर्वी करावी अशी मागणी विकास भगत यांनी केली.
साबांखा नोकरी भाजपने आपल्या खास माणसांसाठी ठेवली असून सामान्य माणसांसाठी नोकरी ठेवली नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी नुकतेच सांगितले की नोकरी प्रक्रियेत घोटाळा झाला असेल तर ते सिद्ध करावे. सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन असे सांगितले. दीपक पाऊस्कर यांनी त्यांचे जागृत देवस्थान दूधसागर येथे येऊन सांगावे की नोकरीसाठी आपल्याकडून किंवा आपल्या भावाकडून एकही पैसा गेलेला नाही असे विकास भगत यांनी सांगितले.