शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील सरकारी शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन देण्याचा विचार सुरू आहे, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले आहे.
म्हैसूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोना परिस्थितीमुळे शाळांमध्ये वर्ग भरविणे शक्य झालेले नाही. केवळ ऑनलाईन वर्ग झाले आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष कसे असेल, याविषयी आताच सांगता येणार नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी अनुकूल व्हावे यासाठी सरकारी शाळांमधील गरीब मुलांना मोफत स्मार्टफोन देण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.
ऑनलाईन वर्ग भरविण्यात येत असल्याने अनेक मुले शिक्षणापासून वंचित रहात आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या अनुकूलतेसाठी स्मार्टफोन वितरीत करण्यासाठी संघ, संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. सरकार देखील या दिशेने लवकरच ठोस पावले उचलणार आहे. कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकार गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून येणार आहे, असेही ते म्हणाले. राज्य सरकारने पदवी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप, टॅब वितरीत करण्याची योजना आमलात आणली आहे. याच धर्तीवर खासगी स्वयंसेवी संघटना, कंपन्यांच्या मदतीने सरकारी शाळांमधील ज्या विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन नाहीत, अशांना स्मार्टफोन वितरीत करण्याचा विचार सुरू केला आहे.