ऑनलाईन टीम / मुंबई :
शाळा सुरु करण्याच्या निर्णयावरुन यूटर्न, शालेय फी कपातीचा निर्णय आणि मुंबईतील रद्द करण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या अनेक मुद्यांवरून विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे. हे ‘सरकार’ आहे की, ‘सर्कस’? अशा शब्दात प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. या संदर्भात त्यानी ट्विट केले आहे.
राज्यात आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुंबईत परीक्षा रद्द करण्यात आली. या मुद्यांवरून देखील दरेकरांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ’सरकार’ आहे की,’सर्कस’? मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांचा आदेश, मुंबईतही शिष्यवृत्तीची परीक्षा घ्या,चा उलटा आदेश, परीक्षा होऊ देणार नाही. राज्यातील 7 लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देतील. मात्र, राज्य सरकारच्या ’धोरण लकव्या’मुळे मुंबईतील विद्यार्थ्यांची संधी हुकेल. असे म्हटले आहे.
तर आपल्या दुसऱया ट्विटमध्ये ते म्हणाले की, मुंबईत रात्री 10 पर्यंत बार आणि मॉल सुरु झालेले चालतात, शिष्यवृत्तीच्या परिक्षेसाठी फक्त कोरोना आडवा येतो का? पालक आणि विद्यार्थी, तुमच्या या ’धोरण लकव्या’मुळे त्रस्त झाले आहेत. शिक्षणाचा खेळखंडोबा करु नका. कोलांटउडयांना जनता त्रासलीय आहे. तसेच
राज्य सरकारने 15 टक्के शिक्षण फी कपातीचा निर्णय पंधरवडय़ापुर्वी घेतला होता. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याच निर्णयाबाबतचा अध्यादेश काढायला नकार दिला ? जनता त्रासलीय तुमच्या या सर्कशीतल्या कोलांट उडय़ांना!, एक काय तो ठाम निर्णय घ्या अन्यथा जन उदेक होईल! असा इशारा देखील दरेकर यांनी यावेळी दिला आहे.