प्रतिनिधी/ मडगाव
सांगे तालुक्यात उगें पंचायत क्षेत्रात आयआयटी व्हावी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) यासाठी स्थानिक आमदार तथा समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हे आग्रही असून त्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज रविवार दि. 3 जुलै रोजी सांगेत महत्त्वपूर्ण बैठक होईल. या बैठकीला सांगेतील जनतेने उपस्थित राहून आपले विचार मांडावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. सांगे बाहेरील व्यक्तींनी सभेत येऊन लुडबूड केल्यास त्याला चौख प्रतीउत्तर देण्याची तयारी देखील मंत्री श्री. फळदेसाई यांनी ठेवली आहे.
आयआयटीला यापूर्वी काणकोण तालुक्यात व नंतर सत्तरी तालुक्यात शेळ-मेळावली येथे स्थानिकांनी विरोध केला. आता सांगे तालुक्यात आयआयटी व्हावी यासाठी मंत्री श्री. फळदेसाई हे प्रयत्नशील आहे. उगें पंचायत क्षेत्रात सुमारे 13 लाख चौरस मीटर जमीन सरकारच्या मालकीची असून यातील सुमारे 30 हजार चौरस मीटर जागेवर काही शेतकऱयांनी आपण शेती करीत असल्याचा दावा केला आहे. या शेतकऱयांशी चर्चा करून त्याचा प्रश्न सोडविण्याची तयारी मंत्री श्री. फळदेसाई यांनी ठेवली आहे. शेतकरी दावा करीत असलेल्या जागेला त्यांना पर्यायी जागा देणे किंवा बाजारभावापेक्षा चार पट अधिक किंमत देऊन ती जागा संपादन करणे हा पर्याय ठेवण्यात आलेला आहे.
तसेच 13 लाख चौरस मीटर्स जागेतील आणखीन 4 लाख चौरस मीटर जागा खासगी असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे 9 लाख चौरस मीटर जागा उपलब्ध होत असून यातील दीड लाख चौरस मीटर जागा ही विवादित आहे. ही जागासुद्धा वजा केली तरी साडेसात लाख चौरस मीटर्स जागा आयआयटीसाठी उपलब्ध होत असल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
सांगेतील युवकांचा आयआयटीला पाठिंबा मिळाला असून आजच्या बैठकीला युवावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सांगे बाहेरील काही शक्ती आयआयटीला खो घालण्याचा प्रयत्न करीत असून हे प्रयत्न आपण खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आयआयटीद्वारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले होणार आहे. केंद्रातील भाजप सरकारने गोव्याला आयआयटी उपलब्ध करून दिली आहे. ती आणखीन विरोध करून घालवायची नाही हे आपले मत असल्याचे श्री. फळदेसाई म्हणाले.