कोरोनाचे रुग्ण आढळल्याने ग्रा. पं. ने घेतला निर्णय : जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान वेळेतही कपात
वार्ताहर / सांबरा
सांबरा येथे कोरोनाचे काही रुग्ण आढळल्यानंतर गावात एकच खळबळ माजली असून ग्राम पंचायतही खडबडून जागी झाली आहे. ग्राम पंचायतीने गावात जाणारे मुख्य रस्ते परगावच्या नागरिकांसाठी बंद केले आहेत तर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या वेळ मर्यादेतही घट केली असून नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावात कोरोनाचे काही रुग्ण आढळल्यानंतर बुधवारी ग्राम पंचायतीमध्ये सदस्य व ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
येत्या काही दिवसात गावामध्ये होणारे लग्नकार्य सकाळी दहाच्या आत साध्या पद्धतीने आटोपून पाहुण्यांना लगेच घरी पाठवावे, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांच्या ठिकाणी जास्त गर्दी करू नये, सर्वांनी सामाजिक अंतर ठेऊन मास्कचा वापर करावा, असे बैठकीद्वारे आवाहन केले आहे.
गावच्या दोन्ही प्रवेशद्वारांजवळ रस्ता सील केला आहे. गावातील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी दहा वाजता दुकाने बंद करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. सर्वांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्राम पंचायतीमार्फत करण्यात आले आहे.