वार्ताहर/ मौजेदापोली
दापोली तालुक्यातील वेळवी येथील एका दुकानात जाऊन चौघाजणांनी तृतीयपंथी असल्याचे भासवत मोबाईल चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. मात्र या चौघांना पकडल्यानंतर ते तृतीयपंथी नसल्याचे उघड झाले. या चारजणांना ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास वेळवी येथील उत्तम मोरे (मूळगाव वडशेत, ता. श्रीवर्धन) यांच्या दुकानाजवळ एक राखाडी रंगाची नॅनो कार थाबवून त्यामधून चार व्यक्ती उतरल्या. साडय़ा नेसलेल्या या चार व्यक्तींनी मोरे यांच्याकडे 500 रूपयांची भिक्षा मागून त्यांचा व्यवसाय चांगला चालेल, असे सांगितले. मोरे यांनी शंभर रूपये देऊ केले. यानंतर त्या चारही व्यक्ती पाचशे रुपये मिळण्यासाठी वाद घालू लागल्या. दरम्यान मोरे यांचे लक्ष चुकवून त्यातील एका व्यक्तीने त्यांचा 9 हजार 990 रूपये किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल लंपास केला. त्यानंतर त्यांनी तेथून काढता काय घेतला.
मोरे यांना मोबाईल चोरीला गेल्याचे काही काळाने लक्षात आले. त्यांना दुकानात वाद घालणाऱया ‘त्या’ चौघाजणांचा संशय आल्यामुळे त्यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. चौकशी करताना ते हर्णैकडे गेल्याचे समजले. त्यामुळे मोरे यांनी हर्णै गाठले. तेथे या चौघाजणांपैकी एकजण मोरे यांना आढळला. मोरे यांना पाहताच तो आपल्या उर्वरित साथीदारांकडे पळत गेला. त्यावेळी पोलीस व हर्णै येथील स्थानिकांनी रात्री 10.30 च्या सुमारास चारहीजणांना ताब्यात घेतले. यावेळी हे तृतीयपंथी नसून चक्क पुरुष असल्याचे आढळून आले. यात रमेश मांडवकर (24), शिवरतन सोळंकी (25), जीवन मांडवकर (19), मोहन मांडवकर (27, सर्व मूळगाव बुलढाणा, सध्या माणगाव) यांचा समावेश आहे. या चौघाजणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अधिकारी प्रमोद झगडे करत आहेत. तृतीयपंथी असल्याचे भासवून चोऱया करण्याचे प्रकार दापोली परिसरात वाढत आहेत. यामुळे याबाबत सावध राहण्याचे आवाहन पोलीस अधिकारी प्रमोद झगडे यांनी केले आहे.