प्रतिनिधी / वाठार किरोली
अंबवडे (सं)वाघोली ता. कोरेगाव येथील जवान दत्तात्रय बाळकृष्ण सकुंडे वय ३४ यांच डेहराडून येथे उपचारादरम्यान निधन झाले. परेडसाठी जात असताना चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्यांना तेथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तेथे उपचार सुरू असताना ते निधन पावले.
दत्तात्रय सकुंडे हे २००६ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सध्या ते डेहराडून येथे कर्तव्यावर होते दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच ते सुटीवर गावी अंबवडे येथे होते. त्यानंतर ते पुन्हा डेहराडून येथे कर्तव्यावर गेले होते. आप्पा फौजी म्हणून ते गावात परिचित होते. बुधवार दि .१७ मार्च रोजी डेहराडूनहुन त्यांचे पार्थिव दु. ४ वाजता पुणे येथे तर तेथून सकुंडे यांच्या मूळ अंबवडे गावी आणण्यात येणार आहे. सायंकाळी उशिरा अंबवडे गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी दिली आहे.