सातारा / प्रतिनिधी
जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा आहे. तद्वतच शिक्षण क्षेत्रातही जिल्ह्याचा नावलौकीक अनेक वर्षांपासून आहे. तो कायम टिकावा आणि जिल्हा शिक्षण क्षेत्रातही कायम अग्रेसर रहावा यादृष्टीने आपले कामकाज करा, पूर्ण क्षमतेने व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कार्यरत रहा. असे आवाहन राज्य अल्पसंख्याक व प्रौढ संचालनालयाचे नूतन उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील अधिनस्त उपशिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना केले.
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांची नुकतीच पदोन्नती झाली, ते शिक्षण उपसंचालक म्हणून अल्पसंख्यांक व प्रौढशिक्षण संचालनालय, पुणे या ठिकाणी रूजू झाले, त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम श्रीमंत गार्डन या हॉटेल मध्ये बुधवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांचे हस्ते आणि माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे,माध्यमिक वेतन पथक अधिक्षक अनिल बनसोडे, प्राथमिक वेतन पथक अधिक्षक पांडुरंग पाटील, अधिक्षक (रा.प.) प्राथमिक/माध्यमिक हेमंतकुमार खाडे,गटशिक्षणाधिकरी गजानन आडे यांचे उपस्थितीत राजेश क्षीरसागर यांचा सपत्नीक, सहकुटुंब शिवरायांची मुर्ती,संविधान ग्रंथ,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करणेत आला.प्रास्ताविकात श्रीकांत जगदाळे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांनी थिंक अ टीचर, माझे कुटुंब माझी जबाबदारी , ऑनलाइन शिक्षण, स्वाध्याय उपक्रम इत्यादी बाबत राजेश क्षीरसागर यांच्या योगदानाचा उल्लेख केला. हेमंतकुमार खाडे म्हणाले, राजेश क्षीरसागर हे अभ्यासू, निर्णयकुशल, आणि कार्यतत्पर अधिकारी आहेत. कोर्ट केसेस, तक्रार निवारण , संघटना बैठका इत्यादी कामे त्यांनी पुर्ण क्षमतेने आणि कार्यकुशलतेने पार पाडली, त्यांच्या काळात प्रलंबीत कामे, पेन्शन केसेस, यांचा निपटारा झाला. शासनाच्या सर्व योजना व उपक्रम त्यांनी प्रभावीपणे राबविल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यकाळात माध्यमिक विभागाचा नावलौकिक वाढल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
तर उपशिक्षणाधिकारी,रविंद्र खंदारे आणि धनंजय चोपडे यांनी क्षीरसागर हे आदर्श व्यक्तिमत्व असून शिक्षण क्षेत्रातील जाणकार व मार्गदर्शक आहेत असे सांगितले. यावेळी विस्तार अधिकारी सन्मती देशमाने, मारुती भांगे, वनिता मोरे, तसेच प्राथमिक/माध्यमिक शिक्षण विभागासह वेतन पथक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. श्रीमंत गार्डनचे मालक प्रतिक श्रीकांत जगदाळे यांनी राजेश क्षीरसागर यांचा बुके देवून स्वागत केले, विस्तार अधिकारी मारुती भांगे यांनी सर्वांचे आभार मानले.प्रारंभी शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी हॉटेल श्रीमंत गार्डनचे औपचारिक उद्घाटन केले.