वाई / प्रतिनिधी
वाई शहरातील हुतात्मा स्मारकाचा कोरोना काळात अगोदर रक्षक क्लिनिक म्हणून तर सध्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे होम आयसोलेशन केंद्र बनले आहे.वाई पालिकेने सुरुवातीच्या दोन महिन्यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने रक्षक क्लिनिक सुरू केले होते. सर्वच स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
कोरोनाने मार्च महिन्यात एण्ट्री केली. त्याच वेळेस वाई पालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षक क्लिनिक सुरू केले होते. या क्लिनिकमध्ये जे बाहेरून येतील त्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी वाई शहरातील डॉक्टर तपासणी करत होते. लक्षणे आढळून आल्यास त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. वाईच्या नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे आणि मुख्याधिकारी विद्या पोळ यांनी ही सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने संकल्पना राबवली होती. पुढे कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर रक्षक क्लिनिक बंद करण्यात आले.
आता पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे बनले होम आयसोलेशन केंद्र
वाई येथील हुतात्मा स्मारकात सोनगिरवाडी भागातल्या पालिका कर्मचाऱ्यांची हजेरी दररोज घेतली जाते. तसेच रक्षक क्लिनिक बंद केल्यानंतर आता जे पालिकेचे कर्मचारी कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. त्यांच्याकरता आयसोलेशन केंद्र बनवले आहे.ते कर्मचारी तेथेच क्वारंटाइन आहेत. पालिकेने त्यांची सोय केलेली आहे. घरी आपल्या कुटूंबात जात नाहीत,असे वाई पालिका सुत्रांनी सांगितले.