प्रतिनिधी / वाई
एक मराठा, लाख मराठा अशा घोषणानी वाईचा प्रांत कार्यालयाचा परिसर दणाणून सोडत आपल्या मागण्यांचे निवेदन वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांना देण्यात आले. यावेळी पोलीस भरती आरक्षण मिळेपर्यंत करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चा वाई तालुका यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रभर आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करत आहे. वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारपासून आंदोलन करण्यात येत आहे. हे निवेदन देऊन तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करून त्या पूर्ण कराव्यात, कायद्याला अनुसरून कायमस्वरूपी मराठा समाजास शैक्षणिक व नौकरीत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतीही शासकीय कार्यालयात नोकरभरती करू नये, आता होऊ घातलेली पोलीस भरती प्रक्रिया थांबवण्यात यावी, आरक्षण मिळेपर्यंत तरुणांना व 60 वर्षावरील वृद्ध यांना महिना 3 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.