प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय कोरोना काळात रुग्णांसाठी देवदूत ठरले असे सगळेजण समजत आहेत. मात्र, कोरोना काळातच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला असल्याचा आरोप करत त्यांची पदावरून हाकलपट्टी करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व विविध संघटनांतर्फे मंगळवार दि. 12 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने बलात्कार केल्याने पोलीसांनी गर्भावस्थेत पिडीतेला सिव्हीलमध्ये उपचारार्थ दाखल करून चार दिवस झाले तरीही स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकीत्सक डॉ.सुभाष चव्हाण यांना माहित नाही?, पत्नीवर गर्भाशयाच्या कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर शेंद्रे येथे उपचार सुरु असतानाच पतीचा आजार बळावल्याने सातारा सिव्हीलमध्ये उपचारासाठी दाखल केलेली व्यक्ती दवाखान्यातून कुठं गेली? हे सिव्हील सर्जनला माहीत नाही. थोडेफार चालता येत असणाऱ्या अपंग व्यक्तीला 2019 मध्ये 46 टक्के प्रमाणपत्र, आता सदर व्यक्ती जाग्यावर बसल्यावर 2021 मध्ये 27 टक्के प्रमाणपत्र कसे दिले? ते डॉ. चव्हाणांना माहीत नाही. कोरोनाच्या काळात कोटयवधी रुपयाचा घपला कसा झाला? ते यांना माहीत नाही. मग हा डॉक्टर माणसांतला की जनावरातला?
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालय म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा बनवलेल्या सिव्हील सर्जनची हकालपट्टी करा, अन कोरोना काळातील कोटयवधी रुपयांच्या खर्चाचे ऑडीट करा, या मागणीसाठी डॉ. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रभारी हेमंत भोसले, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघटना धरणे आंदोलन करणार आहेत.