ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ पिठानी याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. सिद्धार्थला 27 मे रोजी हैदराबादमध्ये अटक करण्यात आली होती. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यात त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी 14 जून रोजी वांद्रे येथील घरात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान सुशांतच्या घरी लॉकडाऊन काळातही बिनदिक्कत अंमली पदार्थ अर्थात ड्रग्ज येत होते अशी माहिती मिळाली. यामध्ये ड्रग्स सेवनाप्रकरणी अनेकांची चौकशी झाली. अनेकांना ताब्यात घेण्यात आले. याच प्रकरणात सुशांतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानी याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने हैदराबादमधून ताब्यात घेतले होते.
सिद्धार्थ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. याआधी सिद्धार्थला एनसीबीने तीन वेळा समन्स पाठवले. यातील एकाही समन्सला सिद्धार्थकडून उत्तर आले नाही. पण अलिकडेच सिद्धार्थचे साखरपुडा केल्याचे फोटो व्हायरल झाले. यावरुन सिद्धार्थचा नेमका ठावठिकाणा सापडला. यानंतर एनसीबीने सिद्धार्थ पिठानीला अटक केली. सिद्धार्थच्या घरातून एनसीबीने अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले. सिद्धार्थ पिठानी ही एनसीबीने ड्रग केसमध्ये केलेली 35 वी अटक आहे. सिद्धार्थ हा सुशांतच्या टीममध्ये होता. तो सुशांतला अंमली पदार्थ देत असल्याचा आरोप आहे.