नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दोन वेळा कुस्ती या क्रीडा प्रकारात ऑलिंपिक पदक मिळविलेल्या सुशिलकुमारचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज दिल्लीतील न्यायालयाने फेटाळला आहे. सागर राणा नामक एका कुस्तीपटूच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचा आरोप सुशिलकुमारवर असून त्याला अटक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र, तो फरार असल्याने अद्याप पोलिसांच्या हाती सापडलेला नाही. आपली अटक टाळण्यासाठी त्याने दिल्लीतील रोहिणी येथील न्यायालयात अटकपूर्व जमिनासाठी 17 मे या दिवशी अर्ज केला होता. सोमवारी त्यावर सुनावणी झाली. आपल्या विरोधात पक्षपात करण्यात येत आहे, असे म्हणणे त्याने युक्तीवादात मांडले होते. मात्र सत्र न्यायाधीश जगदीश कुमार यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सुशिल कुमार याचा अर्ज फेटाळला.