सूनेविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
सैदापूर येथे राहत असलेल्या फिर्यादी अनिता अविनाश लकडे (वय 52), व त्यांची सुन वृषाली लकडे यांच्यात घरगुती कारणावरून वादावादी झाली. सुनेने शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पती अनुप लकडे याच्या हातावर वृषालीने सुरीने वार करून त्याला जखमी केले.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुकवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अनिता अविनाश लकडे, त्यांचे पती अविनाश लकडे व मुलगा अजिंक्य घरात झोपले होते. यावेळी घराजवळ असणाऱया ऑफिसमध्ये झोपलेली सून वृषाली लकडे व मुलगा अनुप लकडे हे घरी आले. घरी येताच सून वृषालीने सासू अनिता लकडे यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरूवात केली. तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगा अनुप याने मध्यस्थी केली. याचा राग मनात धरून वृषालीने घरातील सुरी घेतली. आणि पती अनुप याच्या डाव्या व उजव्या हातावर मारून त्याला जखमी केली. यामुळे सासू अनिता यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सून वृषाली विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास बीट अंमलदार कदम करत आहेत.