शताब्दी सभागृहात सत्कार करून जवानांना देण्यात आल्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
प्रतिनिधी/ कराड
लष्कराच्या माध्यमातून देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कराड व पाटण तालुक्यातील 11 जवानांची शहरात घोडय़ावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या जवानांच्या कुटुंबीयांनीच या मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीनंतर या जवानांचा यथोचित सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या आगळय़ावेगळय़ा मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
कराड व पाटण तालुक्यातील कालवडे, चाफळ (शिंगणवाडी), करवडी, सोनसळ, चोराडे, मराठवाडी, शहापूर, गोसावेवाडी, साबळेवाडी, वाघजाईवाडी या गावांमधील जवान गेली 19 वर्षे देशाच्या विविध भागात कार्यरत राहून देशसेवा बजावत होते. या महिन्यात ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे सेवानिवृत्तीनंतर घरी येताना जंगी स्वागत करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनीच घेतला. त्यानुसार मंगळवारी सकाळी त्यांची कोल्हापूर नाक्यापासून दत्त चौक ते कराड अर्बन शताब्दी सभागृहापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व जवान लष्कराच्या गणवेशात फेटे नेसून घोडय़ावर स्वार झाले होते. या जवानांचे सर्व कुटुंबीय, मुले, मुली हेही मोठय़ा उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दत्त चौकात मिरवणूक आल्यानंतर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन केले. तेथून मिरवणूक शताब्दी सभागृहात गेली.
अर्बन शताब्दी सभागृहात कर्नल एम. डी. कुलकर्णी, कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, डी. जी. साळोखे, दिग्वीजय जाधव, विलास जाधव, चंद्रकांत साठे यांच्या हस्ते सेवानिवृत्त झालेले जवान हणमंत पुंभार, राजेश पवार, संतोष मदने, सुजित जाधव, संदीप पवार, शिवाजी बाबर, सुदाम संकपाळ, अभिजीत पिसाळ, राहुल पाटील, रवींद्र शिंदे, रामचंद्र साबळे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, देशसेवा करताना संपूर्ण कुटुंबाने पाठिंबा दिल्याचे सांगत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही देशसेवेसह समाजसेवेत सक्रीय राहणार असल्याचे सांगत तरूणांनी लष्करात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. दिलीप गुरव, एम. डी. कुलकर्णी, डी. जी. साळोखे, दिग्वीजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त करताना जवानांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रदीप भिसे यांनी आभार मानले. निवृत्त सैनिक दत्तात्रय भिसे, विठ्ठल पुंभार, आनंद पानसकर, अजित जाधव आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
चेहऱयावर आनंद आणि अभिमान
शताब्दी सभागृहात प्रारंभी देशभक्तीपर गीत सादर करण्यात आली. या भारलेल्या वातावरणात निवृत्त जवानांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित जवान व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱयावर आनंद आणि अभिमान दिसत होता. सुमारे 19 वर्षे घरापासून दूर राहात देशसेवा करून निवृत्त होऊन पुन्हा आयुष्याची दुसरी इनिंग सुरू करणाऱया या जवानांबद्दल प्रत्येकालाच अभिमान वाटत होता. अनेक नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या