मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राकडून आंबोलीत सहकाऱयांच्या साथीने शोध : हिरण्यकेशी नदीत आढळली ही प्रजाती : नदीच्या नावावरून नामकरण : केले ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’
संदीप बोडवे, विजय राऊत / आंबोली:
सहय़ाद्रीच्या पर्वतरांगांतील जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱया आंबोलीत आतापर्यंत विविध जातीचे कीटक, पक्षी, बेडूक, उडणारे साप, फुलपाखरे, प्राणी, झाडे सापडून आली आहेत. आता तर आंबोलीतील हिरण्यकेशी नदीच्या गोडय़ा पाण्यात सोनेरी केसांची अति दुर्मिळ अशी माशांची नवी प्रजात सापडून आली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव तेजस ठाकरे यांनी आंबोलीत सहकाऱयांना सोबत घेत ही नवी प्रजात शोधून काढली आहे.
आंबोलीच्या प्रसिद्ध हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानाजवळच ही प्रजात सापडून आल्याने या प्रजातीचे नामकरण ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ असे करण्यात आले आहे. हिरण्यकेशी याचा संस्कृत अर्थ सोनेरी रंगाचे केस असणारा असा सुद्धा आहे. ही सुंदर सोनेरी मत्सय प्रजाती जणूकाही सहय़ाद्रीच्या हृदयातील एक दागिनाच आहे, अशी प्रतिक्रिया संशोधकांनी व्यक्त केली आहे.
तेजस ठाकरे हे महाराष्ट्रासह देश-विदेशातल्या जंगलांत फिरून संशोधन करीत असतात. याआधी त्यांनी खेकडय़ांच्या आणि सहय़ाद्रीच्याच पर्वत रांगांमधून पालीच्या प्रजातींचा शोध लावला होता. या नव्या प्रजातीच्या शोधात तेजस यांच्या सोबत अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा जे रिसर्च पेपरचे प्रमुख आहेत, यांनी सहभाग घेतला होता. त्यांना जयदीप वरसकर यांचेही सहकार्य लाभले.
प्रस्तावाला वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंजुरी
ऑगस्टमध्ये तेजस ठाकरे यांनी राज्य सरकारकडे संशोधनाबाबत एक प्रस्ताव पाठविला होता. वन्यजीव संरक्षण कलमानुसार संरक्षित क्षेत्रात काही काम करायचे असेल, तर त्यासाठी वन्यजीव मंडळाची मान्यता लागते. त्यानुसार तेजस ठाकरे, अनिकेत मराठे, स्वप्नील पवार, अमृत भोसले यांनी हा प्रस्ताव वन्यजीव मंडळाकडे पाठविला होता. त्यांच्या या प्रस्तावाला वन्यजीव मंडळाच्या 15 व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती.
हिरण्यकेशी नदीवरून माशाचे नामकरण
संशोधक प्रवीण राज म्हणाले, या मत्स्य प्रजातीला ‘लोच’ असे म्हटले जाते. आंबोली येथील हिरण्यकेश्वर मंदिराजवळून वाहणाऱया हिरण्यकेशी नदीच्या कुंडात ही दुर्मिळ मत्स्य प्रजाती तेजस ठाकरे यांना 2017 मध्ये सापडली होती. त्यावेळी ही प्रजाती विशेष असल्याचे आम्हाला जाणवले होते. म्हणून आसाम, मेघालय, श्रीलंका तसेच पश्चिम घाटात आढळणाऱया काही मिळत्या-जुळत्या मत्स्य प्रजातींबरोबर या नव्या प्रजातीची तुलना करण्यात आली. यासाठी तिचे डीएनएही तपासण्यात आले. या सर्व परीक्षणाअंती सापडलेली नवी मत्स्य प्रजाती वेगळी असल्याचे सिद्ध झाले. ही रंगीबेरंगी लोच प्रजाती आहे. भारतात अशी प्रजाती कुठेही सापडलेली नाही. या नव्या प्रजातीचे नाव हिरण्यकेशी नदीवरून शिस्टुरा हिरण्यकेशी असे ठेवण्यात आले. उंच ठिकाणच्या कुंडात आढळलेली ही प्रजाती फारच दुर्मिळ आहे. या प्रजातीचे नर सुंदर अशा सोनेरी रंगात उठून दिसतात.
आंतरराष्ट्रीय मासिकांनीही दिली प्रसिद्धी
संशोधक शंकर सुब्रमण्यम म्हणाले, लोच या प्रकारातील माशाची ही 20 वी प्रजाती आहे. ही प्रजाती सहय़ाद्रीच्या डोंगरात बारमाही वाहणाऱया गोडय़ा पाण्यात सापडली आहे. तेजस यांनी शोधलेली ही चौथी प्रजाती आहे. तेजस ठाकरे यांच्या या शोधांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी देऊन मान्यता दिली आहे. मी एक नवीन प्रजाती वर्णन करण्यासाठी एक भाग असल्याबद्दल आनंदी असून सर्वांचा आभारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) तथा महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाचे सदस्य सचिव नितीन काकोडकर यांनीही तेजस ठाकरे नेहमीच दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती शोधत असतात. त्यांच्या शोधाचा दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धन संशोधनात हातभार लागेल हे लक्षात ठेवून आम्हाला खूप आनंद होत आहे.
सहय़ादीच्या हृदयातील दागिना!
संशोधनानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना तेजस ठाकरे म्हणाले, आश्चर्यकारक मासे शोधण्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. हिरण्यकेशी नदी उगम पावते, ते ठिकाण हे आंबोलीच्या जवळच आहे. आम्ही या प्रजातीचे नाव स्थानिक नावाने ठेवले आहे आणि संस्कृतमध्ये ‘हिरण्यकेशी’ म्हणजे ‘सोन्याचे केस’ याचा अर्थ चमकदार सुवर्ण रंग दर्शवितात. शिस्टूरा हिरण्यकेशी मासा महाराष्ट्रातील सहय़ाद्रीच्या हृदयाचा एक दागिना आहे, असेच म्हणावे लागेल.