प्रतिनिधी / सोलापूर,
मोहोळ परिसरात उकिरड्यात पुरुन लपवून ठेवलेले एक एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस व एक तलवार असा 51 हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.
याप्रकरणी आरोपी जनार्दन शंकर लवटे (वय 54, रा. दत्त चौक, मोहोळ, हल्ली खाजाभाई वस्ती मोहोळ) यास अटक करण्यात आली असून श्रीदेवी सुरेश काळे (रा. मोहोळ) ही फरार आहे. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी पदभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील उघडकीस न आलेले गुन्हे उघड करण्यासाठी तसेच जिल्हयात चोरून चालणार्या अवैध धंदयाच्या विरोधात कडक कारवाई करण्यासाठीजिल्हयातील पोलीस अधिकार्यांची बैठक घेवून सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील खाजाभाई शेख वस्तीवर राहणार्या एका इसमाचे घराशेजारी उकीरडयामध्ये देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर पुरून ठेवल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने त्या वस्तीवर छापा टाकून एकास ताब्यात घेतले. त्याच्या घराजवळील उकीरडयामध्ये एक स्टिलच्या डब्यामध्ये एक देशी बनावटीचा रिव्हॉल्व्हर व एक जिवंत काडतूस मिळून आले. घरातील जुन्या विटाखाली एका लेडिज स्कार्फमध्ये गुंडाळून ठेवलेली तलवार मिळून आली. त्याच्याकडून 51 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुध्द पोलीस शिपाई धनराज गायकवाड यांनी फिर्याद दिली.
ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत, सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, राजेश गायकवाड, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले आदींनी केली.