वृत्तसंस्था/ रियाध
अरब देश आणि इस्रायल यांच्यात मधूर संबंध निर्माण करू पाहणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक यश मिळाले आहे. सौदी अरेबियाने इस्रायलच्या प्रवासी विमानांना स्वतःच्या हवाईक्षेत्राचा वापर करण्याची मंजुरी दिली आहे. तेल अवीव आणि दुबई यांच्यादरम्यान मंगळवारपासून थेट विमानसेवा सुरू झाली आहे. ही सर्व उड्डाणे सौदी अरेबियाच्या हवाईक्षेत्रातून होणार आहेत.
सौदी अरेबियाच्या या निर्णयाचा लाखो लोकांना लाभ होणार आहे. तेल अवीव येथून अनेक देशांच्या विमानांमधून प्रवास करणाऱया प्रवाशांचा 3 ते 8 तासांचा वेळ वाचणार आहे. या निर्णयाचा भारतीयांनाही लाभ होणार आहे. ट्रम्प यांचे सल्लागार जेरार्ड कुशनेर यांनी सोमवारी सौदी अरेबियाचे युवराज सलमान यांच्याशी रियाधमध्ये दीर्घ चर्चा केली होती. याच्या काही तासातच सौदी सरकारने इस्रायली विमानांना स्वतःच्या हवाईहद्दीच्या वापराची मंजुरी दिली आहे.
तेल अवीव ते दुबई
इस्रायलमधून युएई येथे जाणाऱया इस्रायलच्या विमानांना अन्य मार्गांचा वापर करावा लागत होता. या प्रवासाकरता वेळ आणि पैसा दोन्हीही अधिक लागत होता. परंतु तेल अवीव आणि दुबईदरम्यान आता थेट विमानसेवा असणार आहे. इस्रायलचे परिवहन मंत्री मिरि रेगेव यांनी सौदी अरेबियाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. याप्रकरणी आता कुठलीच अडचण येणार नसल्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हजारो इस्रायली नागरिक नववर्षानिमित्त दुबई आणि अबूधाबी येथे पोहोचू शकतात.