कोकण रेल्वेची आजपासून कडक अंमलबजावणी
प्रतिनिधी / रत्नागिरी
वारंवार सूचना करूनही तपासणीकरिता रेल्वेच्या वेळेच्यापूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वे आता कडक पाऊले उचलणार आहे. आज मंगळवारपासून उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे. कोकण रेल्वेच्या रत्नगिरी, सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकात या बाबतची कडक अंमलबजावणी करणार आहे.
कोविडचा धोका अजून पूर्णतः टळलेले नाही या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रवासापूर्वी आरोग्य व अन्य तपासणी करत आहे. याकरिता रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वी प्रवाशांनी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावं असे आव्हान गेले काही दिवस कोकण रेल्वे करत आहे. या आवाहनाला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र, काही ठराविक प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होते आहे. आता अशा प्रवाशांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबले जाणार आहे. यामुळे ऐनवेळी येणाऱ्या प्रवाशांना ट्रेनच्या बाहेर रहावे लागण्याची भीती आहे.
कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी कोकण रेल्वे सर्व त्या खबरदारी घेतले जाणारे सर्व उपाय हे प्रवाशांच्या आरोग्याच्या हिताचे आहेत. या सगळ्यांकरिताच कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी अधिकारी सर्व स्थानकात अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना प्रवाशांची साथ अपेक्षित आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर निर्धारित वेळेपूर्वी किमान पाऊण तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचा अन्यथा सुरक्षा तपासणी झाली नाही तर तुमची ट्रेन चुकू शकते असे सांगण्यात आले आहे.