ऑगस्टपासून निर्मिती अपेक्षित -त्यापूर्वी लसींची रशियातून आयात सुरू राहणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या ऑगस्ट महिन्यापासून देशात ‘स्पुटनिक-व्ही’चे उत्पादन सुरू होणार आहे, अशी माहिती रशियामधील भारताचे राजदूत डी. बी. व्यंकटेश वर्मा यांनी दिली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला ‘स्पुटनिक-व्ही’च्या 30 लाख डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे. जून महिन्यात वाढवून 50 लाखापर्यंत पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर देशात यावषी ‘स्पुटनिक-व्ही’च्या 85 कोटीहून अधिक लस तयार केल्या जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. देशातील सहा कंपन्यांशी स्पुटनिक लस भारतातच बनविण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच सिंगल डोस असलेली ‘स्पुटनिक-लाइट’ लस मिळविण्यासाठीही भारताचे प्रयत्न सुरू आहेत.
भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीचा समावेश झाला आहे. लवकरच ही लस लाभार्थींना दिली जाणार आहे. ‘स्पुटनिक-व्ही’ची पहिली खेप 1 मे रोजी भारतात आली. त्यानंतर दुसरी खेपही दाखल झाली असून त्याचा पुरवठा देशाच्या वेगवेगळय़ा भागात सुरू झालेला आहे. भारतात रशियाची ‘स्पुटनिक-व्ही’ची किंमत निश्चित केली गेली आहे. एका डोसची किंमत 995 रुपये इतकी निश्चित झाली असून विशेषतः खासगी इस्पितळांमध्ये ही लस उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. ही लस रशियातून आयात केलेली असल्यामुळे सध्या किंमत अधिक वाटत असली तरी भारतात या लसीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर तिची किंमत कमी होऊ शकते, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
कोरोना व्हायरसच्या संसर्गाविरुद्ध रशियन ‘स्पुटनिक-व्ही’ लस वापरण्यास अधिकृत मान्यता देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या, काही अब्ज किंवा 40 टक्के लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आता या लसीच्या वापरास मंजुरी मिळाली आहे. ही लस कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक असल्याचा दावा केला जात आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यास होणार मदत
डॉ. रेड्डीज लॅबने मागील आठवडय़ात हैदराबाद येथील व्यक्तीला पहिला डोस देत ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे लाँचिंग केले. ही लस भारतात सर्वात पहिल्यांदा दिपक सापरा यांना टोचण्यात आल्याचे जाहीर केले होते. सापरा हे रेड्डीज लॅबच्या कस्टम फार्मा सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड आहेत. रशियाची ही लस भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तिसऱया टप्प्यात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासही मदत होणार आहे.