- 31 मे पासून पाच तास सुरू राहणार दुकाने
ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या नव्या नियमावलीनुसार प्रदेशात आता 7 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली.
ते म्हणाले, या कर्फ्यू काळात 31 मे पासून सर्व दुकाने आठवड्यात 5 दिवस रोज 5 तास सुरू ठेवली जाणार आहेत. सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या काळात सुरू ठेवली जाणार आहेत. राज्य सरकारने याबाबत सरकारने आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार सरकारी कार्यालये आठवड्यातील पाच दिवस 30% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केली जाणार आहे. तसेच सर्व शैक्षणिक संस्था 5 जून पर्यंत पूर्णपणे बंद असतील. यासोबतच सरकारी परिवहन बस सेवा देखील बंद राहणार आहेत.
मुख्य सचिव अनिल खाची यांनी सांगितले की, बस सुरू करण्याबाबतचा निर्णय 5 जून रोजी घेतला जाईल. यासोबत शिक्षण संस्था तसेच अन्य बाबींचा निर्णय त्याच दिवशी घेतला जाईल.
- आतापर्यंत 3040 जणांनी गमावला कोरोनामुळे जीव
दरम्यान, मागील 24 तासात 1,523 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1,87,342 वर पोहोचली आहे. कालच्या दिवशी 3,148 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 1,65,786 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 18 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.