वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे झालेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत बुकेन्सच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर हॉलंडने बेल्जियमच्या 6-4 अशा गोलफरकाने पराभव करत पाचवे स्थान पटकाविले. या स्पर्धेत कोरियाला हरवून दक्षिण आफ्रिकेन नववे स्थान घेतले. पाकला 11 व्या तर कॅनडाला 13 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पेनने सातवे तर मलेशियाने आठवे, पाकने 11 वे स्थान मिळविले.
रविवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात हॉलंडतर्फे मिलेस बुकेन्सने आठव्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यानंतर त्याने 20 व्या आणि 27 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल नोंदविले. ब्रेंट व्हॅन बिजेनेनने 15 व्या मिनिटाला, जेनसेनने 39 व्या मिनिटाला तर कास्पर व्हॅन डेर व्हेनने 50 व्या मिनिटाला गोल नोंदविले. बेल्जियम संघातर्फे डिप्लसने 25 व्या मिनिटाला, डय़ुव्हेकोटने 36 व्या आणि 38 व्या मिनिटाला तसेच व्हिंटरने 52 व्या मिनिटाला गोल नोंदविले.
दुसऱया एका सामन्यात स्पेनने मलेशियाचा 4-1 असा पराभव करत सातवे स्थान मिळविले. या सामन्यात स्पेनतर्फे क्युनिलने 49 व्या, 55 व्या, 58 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवीत हॅट्ट्रीक साधली. स्पेनचा चौथा गोल सिमोने सातव्या मिनिटाला केला. मलेशियातर्फे एकमेव गोल अनुरने चौथ्या मिनिटाला नोंदविला. मलेशियाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दक्षिण आफ्रिकेने कोरियाचा 4-0 असा पराभव करत नववे स्थान मिळविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. दक्षिण आफ्रिकेतर्फे कर्णधार मॉर्गनने 35 व्या आणि 47 व्या मिनिटाला असे दोन गोल तर लोराने 47 व्या आणि केराईने 53 व्या मिनिटाला गोल नोंदविले. कोरियाला 10 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत पाकने पोलंडचा 5-0 असा पराभव करत 11 वे स्थान मिळविले. पाकतर्फे रिझवान अलीने दुसऱया आणि सहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले. मोईन शकीलने 22 व्या मिनिटाला, कर्णधार अब्दुल राणाने 30 व्या मिनिटाला तर मोहम्मद हमाउद्दीनने 43 व्या मिनिटाला गोल नोंदविले. पोलंडला 12 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
अन्य एका सामन्यात कॅनडाने चिलीचा 2-1 असा पराभव करत 13 वे स्थान पटकाविले. कॅनडातर्फे जॉन जेकोबायने 40 व्या मिनिटाला तसेच केंगने 52 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविले. चिलीतर्फे एकमेव गोल 57 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर ऍमोरोसोने केला. चिलीला 14 वे स्थान मिळाले. दुसऱया एका सामन्यात अमेरिकेने इजिप्तचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 3-0 असा पराभव करत 15 वे स्थान पटकाविले. इजिप्त या स्पर्धेत शेवटच्या म्हणजे 16व्या स्थानावर राहिला.