पुढील महिन्यापासून रेडी टू ईट फूट उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रेल्वेगाडय़ांमध्ये आता पुन्हा प्रवाशांना खाद्यपदार्थ मिळणार आहेत. रेल्वेप्रवाशांसाठी ई-कॅटरिंग सुविधा फेब्रुवारीपासुन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याकरता आयआरसीटीसीला अनुमती दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी प्रारंभी काही निवडक रेल्वेस्थानकांमध्ये होणार आहे.
टाळेबंदीनंतर रेल्वेसेवा सुरू झाली असता त्यात पँट्री कार नव्हती, पण, आता आयआरसीटीसीच्या या सुविधेमुळे प्रवासी पसंतीच्या रेस्टॉरंटमधून स्वतःचे खाद्यपदार्थ ऑनलाईन नोंदवू शकतात. कुठल्या स्थानकावर किती वेळेत हे खाद्यपदार्थ पोहोचणार ही माहिती प्रवाशांना ऑर्डरवेळीच मिळणार आहे. संबंधित खाद्यपदार्थ प्रवाशाच्या आसनावरच पोहोचविण्यात येणार आहेत.
पूर्ण खबरदारी बाळगणार
रेल्वे रेस्ट्रो या महिन्याच्या अखेरपासून काम सुरू करण्यास तयार आहे. याकरता कंपनीने कठोर दिशानिर्देश दिले आहेत. यात संचालनादरम्यान अनेकदा कर्मचारी आणि डिलिव्हरी कर्मचाऱयांची थर्मल स्कॅनिंग, नियमित वेळेत किचनची सफाई, कर्मचाऱयांकडून मास्कचा वापर इत्यादी पावले उचलण्यात येणार आहेत.
मोठय़ा कंपन्यांशी करार
आयआरसीटीसीने अनेक दिग्गज फूड कंपन्यांशी करार केला आहे. रेल्वेच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना आता एमटीआर, आयटीसी, डूकेन, वाघबकरी, आरके कॅटरर, हल्दीराम समवेत अनेक प्रख्यात कंपन्यांचे रेडी टू ईट फूड मिळणार आहे. फोनद्वारेही ई-कॅटरिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे. याचबरोबर आयआरसीटीसी ई-कॅटरिंग ऍप फूड ऑन ट्रक डाउनलोड करता येणार आहे. प्रवाशांच्या सुविधेकरता कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायही देण्यात येणार आहे.