इम्रान सरकारला आता कर्ज मिळणे अवघड – घाना अन् केनियासारखी झाली अवस्था
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
भारताच्या सर्वनाशाची स्वप्ने पाहणारा पाकिस्तान आता जगातील 10 सर्वाधिक कर्जधारक देशांपैकी एक ठरला आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालात अन्य देश किंवा संस्थांकडून सर्वाधिक कर्ज घेतलेल्या 10 देशांमध्ये पाकिस्तान सामील झाल्याचे म्हटले गेले आहे.
कोरोना संक्रमणानंतर जागतिक बँकेचा अहवाल पाकिस्तानसाठी दुहेरी वार करणारा ठरणार आहे. पाकिस्तानला आता विदेशातून कर्ज मिळणे अवघड होऊ शकते. डेट सर्व्हिस सस्पेंशन इनिशिएटिव्हच्या (डीएसएसआय) अंतर्गत पाकिस्तानच्या कर्ज मागणीचे सर्व प्रस्ताव रोखले जाऊ शकतात.
डीएसएसआय म्हणजे काय?
या पुढाकाराच्या अंतर्गत बिकट आर्थिक स्थितीत असणाऱया विकसनशील देशांना मिळणारे कर्ज काही काळासाठी रोखण्यात येते. याला डेट सर्व्हिस सस्पेंशन इनिशिएटिव्ह म्हटले जाते. या देशांच्या यादीत पाकिस्तानसोबत बांगलादेश, इथियोपिया, घाना, केनिया, नायजेरिया, मंगोलिया, उज्बेकिस्तान, अंगोला, जाम्बिया यासारखे देश सामील आहेत.
10 देशांवर 59 टक्के कर्ज
या 10 देशांचे कर्ज 2020 च्या अखेरपर्यंत 509 अब्ज डॉलर्स इतके होते. 2019 च्या तुलनेत हा आकडा 12 टक्क्यांनी अधिक आहे. जगभरातील देशांसाठी देण्यात आलेल्या कर्जाच्या 59 टक्के केवळ या देशांनीच उचल केली आहे. बहुतांश संस्थांनी या देशांना आता कर्ज देण्यास नकार दिला आहे. याचमुळे मोठय़ा प्रमाणात कुठल्याही व्याजदरावर कुठल्याही हमीशिवाय ते कर्ज घेत आहेत. याचे एक उदाहरण पाकिस्तान असून तो चीनकडून सातत्याने सीपीईसी प्रकल्पाच्या नावावर कर्ज घेतोय आणि त्यावरील व्याजदर कधीच उघड केले जात नाही.
कर्जमाफीची याचना
आर्थिक संकटातून जाणाऱया आणि दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या पाकिस्तानने सुमारे 4 महिन्यांपूर्वी चीनला कर्ज माफ करण्याची याचना केली होती. पण चीनने याला स्पष्ट नकार दिला आहे. इम्रान खान सरकारने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या अंतर्गत घेण्यात आलेले 300 कोटी डॉलर्सचे कर्ज (सुमारे 22 हजार कोटी रुपये) माफ करण्याचे आवाहन केले होते. चीनने कर्ज माफ करावे आणि सीपीईसी प्रकल्पाची पुनर्रचना करावी अशी पाकिस्तानची इच्छा होती.