57 प्रवासी जखमी : वैष्णोदेवी येथे जाणाऱ्या बससोबत दुर्घटना
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मूमध्ये कटरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर झज्जर कोटलीनजीक मंगळवारी सकाळी एक बस पुलावरून खाली कोसळली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 57 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी धाव घेत स्थानिक लोक, सीआरपीएफ आणि एसडीआरएफने बचावमोहीम राबवून जखमींना रुग्णालयात हलविले आहे.
संबंधित बस अमृतसर येथून वैष्णोदेवीच्या दिशेने प्रवास करत होती. या बसमधून 75 जण प्रवास करत होते. सर्व प्रवासी हे मूळचे बिहारचे रहिवासी होते. या दुर्घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर उर्वरित प्रवाशांना किरकोळ इजा झाली आहे. गंभीर जखमींना जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जम्मूच्या उपायुक्त अवनी लवासा यांनी दिली आहे.
ब्रेक फेल झाल्याने दुर्घटना
दुर्घटनेचे कारण बसचे ब्रेक फेल होणे असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रेक फेल झाल्यावर चालकाने बसवरील नियंत्रण गमाविले आणि बस पुलावरून खाली कोसळल्याचा अनुमान व्यक्त होत आहे. बचावकार्य पूर्ण झाले आहे. सर्व जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरण्यात आले होते. याप्रकरणाच्या तपासादरम्यान या पैलूलाही पडताळून पाहिले जाणार असल्याचे जम्मूचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंदन कोहली यांनी सांगितले आहे.
सर्व मृत एकाच कुटुंबातील
उपलब्ध माहितीनुसार दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. हे कुटुंब अमृतसरच्या फतेहगढ येथे राहत होते. घरातील मुलाच्या मुंडनासाठी ते वैष्णोदेवी दर्शनासाठी रवाना झाले होते. घटनेनंतर मृत प्रवाशांचे नातेवाईक जम्मूसाठी रवाना झाले आहेत.