नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या तिसऱया लाटेदरम्यान देशाने लसीकरणाचा आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. शुक्रवारपर्यंत देशात लसीचे 150 कोटी डोस देण्यात आले आहेत. को-विन ऍपवर झालेल्या नोंदीनुसार दुपारी दोन वाजेपर्यंत देशात 150 कोटी डोस देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत समाधान व्यक्त करत आणखी एक ऐतिहासिक टप्पा पार केल्याचे ट्विट केले आहे. या मोहिमेदरम्यान देशातील 90 टक्के प्रौढ लोकसंख्येला दोन्ही डोस देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली होती. त्यानंतर आतापर्यंत जवळपास वर्षभरात 150 कोटी डोस देण्यात आले आहेत. सुरुवातीचे 20 कोटी डोस 131 दिवसांत दिले गेले. पुढील 20 कोटी डोस 52 दिवसांत देण्यात आले. यानंतर 40 ते 60 कोटी डोस देण्यासाठी केवळ 39 दिवस लागले. त्यानंतर मोहीम अधिक तीव्र करत 60 कोटींवरून 80 कोटी डोसपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 24 दिवस लागले. त्यानंतर 80 कोटींवरून 100 कोटी डोसपर्यंत पोहोचण्यासाठी 31 दिवस लागले. आता 100 ते 150 कोटी लसीचे डोस मिळण्यासाठी 78 दिवस लागल्याची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत को-विन ऍपवर झालेल्या नोंदीनुसार देशात 150 कोटी 58 लाख 17 हजार 600 इतके डोस देण्यात आले आहेत.
पंतप्रधानांनी मानले आभार
लसीकरण मोहिमेंतर्गत पंतप्रधान मोदींनी देशातील शास्त्रज्ञ, लस उत्पादक आणि आरोग्य मंत्रालयाचे आभार मानले. आपण शून्यातून या शिखरावर पोहोचलो हे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे ते म्हणाले. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे 1.68 कोटी मुलांना एक डोस देण्यात आला आहे. हे यश संपूर्ण देशाचे आणि प्रत्येक राज्य सरकारचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोमवारपासून वृद्धांना बुस्टर डोस
देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षांवरील आजारी वृद्ध व्यक्ती, आरोग्यसेवा आणि आघाडीवर असलेल्या कर्मचाऱयांना सोमवार, 10 जानेवारीपासून लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. सरकारने कॉमोरबिडीटी अंतर्गत येणाऱया 22 आजारांची यादी जाहीर केली आहे. 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नसल्याची स्पष्टोक्ती केंद्र सरकारने दिली आहे.