देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महसूल गुप्तचरांचा तपास सुरु
प्रतिनिधी /मडगाव
शारजाहहून गोव्याला पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला येत असलेल्या एका विमानातून डीजेआय मॅवीक ऍर 2 फ्लायमोर कोम्बो जातीची 19 ड्रोन घेऊन आलेल्या पाच प्रवाशांना महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतलेले असून सुमारे 30 लाख रुपये किमतीची सर्व 19 ड्रोन जप्त करण्यात आलेली आहेत.
पहाटे पहाटे आलेल्या या विमानातील संशयित आरोपी हे उत्तर प्रदेश. बिहार. महाराष्ट्र राज्यातील असल्यामुळे या प्रकरणाला आंतरराज्य स्वरुप प्राप्त झाले आहे.
महम्मद अयुब उर्फ महमद अयुब मोहसीन राझा, जनेत अफझल शेख आणि जेनुदल हक यांना महसूल गुप्तचर खात्याच्या गोवा प्रांतातील अधिकाऱयांनी कस्टम कायद्याच्या 104 व 135 कलमाखाली अटक केली आहे.
या प्रकरणातील वरील संशयित आरोपी शारजाहून गोव्यात येत होते. ही मंडळी दाबोळी विमानतळावर उतरली तेव्हा त्यांच्याकडे तंबाखु, पेस्टच्या रुपातील सोने आणि डीजेआय मॅवीक ऍर 2 फ्लायमोर कोम्बो जातीची 19 ड्रोन सापडली. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत नाजुक असे होते.
जप्त करण्यात आलेले ड्रोन कुठल्या प्रकारचे आहेत आणि त्या ड्रोनची खासियत काय आहे आणि इतकी ड्रोन कशासाठी भारतात आणण्यात आलेली आहेत याचा सध्या तपास चालू आहे.
या प्रकरणातील संशयितांना 19 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आलेली आहेत. सामान्य व्यक्ती इतकी ड्रोन घेऊन प्रवास करणार नाही. अत्यंत आधुनिक ड्रोन भारतात बेकायदेशीररित्या आणण्यामागील हेतू काय आहे याचा तपास सध्या महसूल गुप्तचर घेत असल्याची माहिती सुत्रानी दिली.