कैसर कोकाचा मृत दहशतवाद्यांमध्ये समावेश
वृत्तसंस्था / श्रीनगर
काश्मीर खोऱयात दहशतवादाच्या विरोधात लढणाऱया सुरक्षा दलांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ातील वांदकपोरा-अवंतीपोरा भागात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कैसर कोकाला त्याच्या साथीदारासह कंठस्नान घातले आहे. कैसर 2018 पासून काश्मीरमध्ये सपीय होता, दहशतवादी हल्ले आणि नागरिकांच्या हत्येप्रकरणी तो वाँटेड होता. त्याचा मृत्यू जैश-ए-मोहम्मदसाठी मोठे नुकसान तर सुरक्षा दलांचे मोठे यश असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी म्हटले आहे.
वांदकपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष पथक आणि सैन्याच्या पथकाने संबंधित भागात धाव घेत दहशतवाद्यांचा शोध चालविला होता. सुरक्षा दलांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, यावर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले आहेत.
वांदकपोरामध्ये कैसर कोका हा दहशतवादी देखील लपून बसला होता. सुरक्षा दलांनी त्याला आत्मसमर्पणाची संधी दिली, परंतु त्याने गोळीबार सुरूच ठेवला होता. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहीम सुरूच राहणार आहे. काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करू पाहणाऱया कुठल्याही दहशतवाद्याला सोडले जाणार नसल्याचे विजय कुमार यांनी म्हटले आहे.