उत्तर प्रदेशातील सातव्या आणि अंतिम टप्प्यातील 607 उमेदवारांपैकी 28 टक्के म्हणजे 170 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभुमीचे आहेत, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने दिली आहे. या संस्थेकडून या टप्प्यातील उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून ही माहिती उघड झाल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
या टप्प्यातील काही उमेदवारांवर हत्येचा प्रयत्न करणे किंवा तत्सम गंभीर गुन्हय़ांचीही नोंद आहे. अनेक उमेदवारांवर राजकीय गुन्हे नोंद करण्यात आले आहे. आतापर्यंतच्या सहा टप्प्यातील उमेदवारांमध्येही जवळपास 30 टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तीन ते चार गुन्हे नोंद असणाऱया उमेदवारांची संख्या 8 टक्के असल्याचे दिसून आले आहे.
गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीच्या उमेदवारांप्रमाणेच 60 टक्क्यांहून अधिक उमेदवार कोटय़धीश असल्याचेही स्पष्ट झाले आहे. एक उमेदवारांच्या नावे 50 कोटीहून अधिक रुपयांची मालमत्ता नोंद असल्याचे प्रतिज्ञापत्रांवरुन समजून येते. राजकारणातील पैसा आणि गुन्हेगारी यांचा अनिर्बंध सहभागासंबंधी अनेक लोकशाहीप्रेमींनी अनेकदा चिंता व्य़क्त केली असूनही हे प्रकार वाढत आहेत.
सप आघाडीवर
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱया गुन्हेगारीच्या संख्येत सातव्या आणि अंतिम टप्प्यात सपची आघाडी आहे. या पक्षाच्या 45 उमेदवारांपैकी 26 उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. भाजपच्या 47 उमेदवारांपैकी 26 गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर बसपच्या 52 उमेदवारांपैकी 20 अशा प्रकारचे आहेत.