वृत्तसंस्था / कुड्डालोर
तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्हय़ात नदीत स्नान करताना 7 मुली पाण्यात बुडाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली होती. पाणबुडय़ांच्या मदतीने या सर्व मुलींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी हे मृतदेह कुड्डालोर रुग्णालयात नेण्यात आले असून पोलिसांनी याप्रकरणी तपास चालविला आहे.
कुचिपलयमनजीक गेडिलम नदीवर निर्माण करण्यात आलेल्या बंधाऱयावर या सातही मुली स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. याचदरम्यान दोन मुली अधिक खोल असलेल्या पाण्यात गेल्यावर बुडू लागल्या. त्यांना वाचविण्यासाठी उर्वरित मुलींनी तेथे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्या देखील बुडाल्या. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे कृषीमंत्री एमआरके पन्नीरसेल्वन यांनी रुग्णालयात जात शोकाकुल कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.