पंजाब सीमेवर सीमाशुल्क अधिकाऱयांची कारवाई
अमृतसर / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातून पाकिस्ताच्या मार्गाने भारतात आणले गेलेले 700 कोटी रुपयांचे हेरॉईन पंजाब सीमेवर जप्त करण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱयांनी रविवारी ही कारवाई केली. जून 2019 नंतर हा जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थांचा सर्वात मोठा साठा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. एका ट्रकमधून तो अत्तारी चौकीवरुन भारतात आणण्यात येत होता.
पंजाबच्या अमृतसर सीमेवर ज्येष्ठमधाच्या गोणींमध्ये लपवून हे हेरॉईन भारतात घुसविण्याचा तस्करांचा प्रयत्न होता. मात्र या गोण्यांच्या क्ष किरण तपासणीमध्ये ज्येष्ठमधाबरोबरच हेरॉईन असल्याचे आढळून आले. त्यामुळे गोण्या उघडण्यात आल्या. तेव्हा हा अंमली पदार्थांचा प्रचंड साठा उघडकीस आला.
गस्त वाढविली
पंजाब सीमेवर गस्त वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमेवरील काही चौक्यांवरुन सीमाशुल्क अधिकाऱयांपासून लपवून अंमली पदार्थ भारतात आणले जाण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे संपूर्ण सीमेवर दक्षता बाळगली जात आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीतून कमावलेला पैसा दहशतवादी कारवायांसाठी उपयोगात आणला जातो असे दिसून आले आहे.
लाकडाच्या तुकडय़ांमध्ये
ज्येष्ठमधासारख्याच दिसणाऱया लाकडाच्या छोटय़ा तुकडय़ांमध्ये ड्रीलींग मशिनने भोके करुन त्यात हा अंमली पदार्थ दडविण्यात आला होता. हे सर्व तुकडे फोडल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. एकंदर 102 किलो वजनाचे हे हेरॉईन होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 700 कोटी इतकी आहे. या प्रकरणी सखोल चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. ज्येष्ठमध असल्याचे भासवून हेरॉईनची तस्करी करण्याचा हा प्रथमच प्रकार असू शकेल, असेही बोलले जाते.