श्वान पालनाची आवड असणारे असंख्य लोक असतात. एक, दोनपासून 20 ते 30 पर्यंतही त्यांच्याकडच्या श्वानांची संख्या असू शकते. काही श्वानप्रेमींना बेवारस कुत्र्यांना आधार देण्याचीही आवड असते. तथापि, 90 वर्षांच्या एका आजीची कहाणी विशेष आणि अनुकरणीय आहे. या आजी 120 बेवारस कुत्र्यांचा सांभाळ करतात. त्यांच्यासाठी पहाटे 4.30 वाजता उठून दररोज स्वयंपाक करतात. उन्हाळय़ाच्या दिवसात त्यांना पाणी पाजतात. स्वयंपाकासाठी आजींनी कोणताही मदतनीस किंवा आचारी ठेवलेला नाही. त्या स्वतःच या वयात हे सर्व काम करतात. त्यांच्या नातीने त्यांची ही अनोखी कहाणी व्हायरल केली आहे.
या आजींच्या पतीला बेवारस आणि निराधार प्राणी पाळण्याचा छंद होता. एक भूतदया या नात्याने ते हे काम करीत होते. त्यांचाच वारसा या आजींनी पुढे चालविला आहे. खरे तर आता त्यांची प्रकृती ठिक नसते. त्यांना स्वतःलाच विश्रांतीची आणि आधाराची आवश्यकता आहे. तरीही निर्धारपूर्वक त्यांनी आपले हे भूतदया व्रत कठीण परिस्थितीतही पुढे चालविले आहे. दोन तीन वेळेला त्या स्वतः अंथरुणाला खिळून होत्या. तरीही त्यांनी त्यांचा वसा सोडला नाही, असे त्यांची नात सना हिने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. आपल्याला इतके दीर्घायुष्य मुक्मया प्राण्यांच्या सेवेसाठीच मिळालेले आहे, असा या आजींचा विश्वास आहे. त्यांची एक एनजीओ असून तिचे नाव ‘पॉज इन पुडल’ असे आहे. त्यांची नातही आता ही एनजीओ चालवित आहे. या आजींची कहाणी ‘हय़ूमन्स ऑफ बॉम्बे’ या संघटनेनेही शेअर केलेली आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी या कार्याला साहाय्य केलेले आहे.