बहुतेक गणपती दीड दिवसांचे : कर्फ्यूमुळे सभा बैठका अडकल्या
प्रतिनिधी /फोंडा
जून महिना अर्ध्यावर आला म्हणजे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशोत्सवाची तयारी सुरु होते. सभा बैठका होऊन उत्सव समित्यांची निवड व लॉटरी कुपनसह कार्यक्रमाची रुपरेषाही आखली जाते. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवावर अनिश्चितेचे सावट आहे. कोरोनाचे ग्रहण अद्याप संपलेले नाही, उलट सप्टेंबरमध्ये तिसऱया लाटेचे संकेत देण्यात आल्याने, यावर्षीही अत्यंत मर्यादित स्वरुपात हा उत्सव साजरा होण्याची शक्यता आहे.
कर्फ्यूमुळे सभा बैठका अडकल्या
कोरोनाच्या दुसऱया लाटेतून अद्याप परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. त्यात राज्यव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळांना सभा बैठका घेणे शक्य नाही. कर्फ्यू अजून किती दिवस लांबणार याची शाश्वती नसल्याने सर्व कार्यक्रमांना कात्री लावून केवळ प्रथा म्हणून दीड दिवस गणपती पुजण्याच्या विचारात बहुतेक गणेशोत्सव मंडळे आहेत. यंदा गणेश चतुर्थी 10 सप्टेंबरला आली असून गणेशोत्सव मंडळांच्या अद्याप बैठकाही झालेल्या नाहीत. सार्वजनिक उत्सवासंबंधी लागू होणाऱया मार्गदर्शक तत्त्वांवरच सर्वकाही अवलंबून असल्याचे मंडळांच्या पदाधिकाऱयांनी सांगितले.
फोंडा तालुक्यात छोटे मोठी मिळून साधारण 15 ते 20 गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी बहुतेक गणपती नऊ व अकरा दिवसांचे असतात. गेल्या वर्षी दीड दिवस व कुठलाच थाटमाट न करता अत्यंत मर्यादित स्वरुपात हे गणपती पुजण्यात आले. गणपतीची पूजा सोडल्यास गर्दी टाळण्यासाठी इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
क्रांती मैदान फोंडा येथील सर्वात जुन्या अशा सदर गणेशोत्सव मंडळाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. हे सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठय़ा थाटामाटात साजरे करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. कोरोनाची पहिली लाट ओसल्यानंतर त्यांनी तयारीही सुरु केली होती. मात्र दुसऱया लाटेमुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली व सर्व नियोजन रद्द करावे लागले. गेल्यावर्षी हा गणपती क्रांती मैदानाऐवजी तिस्क फोंडा येथील मंडळाच्या सभागृहात पुजण्यात आला व तोही दीड दिवस होता. तुर्त कोरोनाची स्थिती आटोक्यात येईपर्यंत कार्यक्रमांचे नियोजन सोडाच सभा बैठकाही घेणे शक्य नसल्याचे मंडळाचे सचिव जयवंत आडपईकर यांनी सांगितले.
जुने बसस्थानक फोंडा येथील श्री झरेश्वर गणेशोत्सव मंडळातर्फे गेल्या 33 वर्षांपासून इंदिरा मार्केटमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत मंडळाची सभा होऊन तयारी सुरु व्हायची. यावर्षी अद्याप उत्सव समितीही निवडली गेलेली नाही. मंडळाचा गणपती किमान आठ फुट उंचीचा असतो. गेल्या वर्षी छोटासा मांडव उभारुन 3 फुटांची मूर्ती आणून दीड दिवसच गणपती पुजण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव ऍड. जितेंद्र नाईक यंदी दिली. 34 वर्षांची परंपरा असलेल्या वरचा बाजार फोंडा येथील बुधवारपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या काही पदाधिकाऱयांनी यंदाचा उत्सव दीड दिवसांचाच असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सभा झाल्यानंतरच त्यासंबंधी सविस्तर निर्णय होईल. पण एकंदरीत परिस्थिती पाहता, उत्सवाचे स्वरुप मर्यादित ठेवावे लागले असे त्यांनी सांगितले.
तिस्क उसगांव येथील पीडीए मार्केटमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची उत्सवासंबंधी बैठक अद्याप झालेली नाही. बैठकीनंतरच सर्व सभासदांशी सल्लामसलत होऊन पुढील निर्णय होणार आहे. कुंडई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन नुकतीच बैठक घेतली. त्यात उत्सव समितीही निवडण्यात आली. पण नित्य पूजा सोडल्यास इतर सर्व कार्यक्रम रद्द करुन अत्यंत साध्या पद्धतीने व दीड दिवस गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. चतुर्थीपर्यंत कदाचित परिस्थिती आटोक्यात आल्यास उत्सवासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यक्रमात बदल होऊ शकतो, असे मंडळाचे पदाधिकारी शांतो नाईक यांनी सांगितले. भाटी शिरोडा येथील ओंकार गणेशोत्सव मंडळ तसेच बोरी येथील साखळय़ो सार्वजनिक गणेत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी यंदा दीड दिवसच उत्सव साजरा करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
यंदाही मूर्तीचे आकार छोटेच…!
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे मोठा थाटमाट, आकर्षक सजावट व गणपतीच्या भव्य मूर्ती. गेल्या वर्षी कोरोनामुळे उत्सवावर मर्यादा आल्याने फोंडा तालुक्यातील बहुतेक मंडळानी छोटय़ा आकाराच्या मूर्ती आणून पुजेला लावल्या. उत्सवही दीड दिवसांतच आटोपता घेतला. यंदाही 3 ते 4 फुट उंचीच्या मूर्ती घडविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी ऑर्डर दिल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.